Crime News : हरियाणातील रोहतक येथील धान्य बाजारातील प्रसिद्ध अडत व्यापारी आणि आयपीएस अधिकारी राहुल बल्हारा यांचे वडील जयपाल बल्हारा (वय 60) यांनी शुक्रवारी (6 फेब्रुवारी) दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या बाजार समितीतील कार्यालयात घडली. जयपाल बल्हारा हे बाजार समितीतील आघाडीच्या व्यापाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बाजारपेठेत आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : नाव चुकीचे सांगितले, पण आडनावावरुन सगळं समोर; पीएसआय पल्लवी जाधव यांनी कसा रोखला 'तो' बालविवाह?
कोणताही तणाव नव्हता
विशेष म्हणजे, हा आत्मघाती निर्णय घेण्याच्या दोन तास आधी जयपाल बल्हारा हे अडत असोसिएशनच्या बैठकीत सहभागी झाले होते. असोसिएशनचे अध्यक्ष स्वतंत्र विज यांनी सांगितले की, दुपारी अडीच वाजेपर्यंत झालेल्या बैठकीत ते अत्यंत आनंदी आणि सामान्य दिसत होते, त्यांच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता. बैठकीनंतर ते आपल्या दुकानावर आले, पाणी प्यायले आणि काही वेळ मित्रांसोबत पत्त्यांच्या खेळातही सहभागी झाले. सव्वाचार वाजता ते पुन्हा दुकानाबाहेर आले आणि काही वेळ मोबाईल पाहत बसले, त्यानंतर अचानक त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
फोनमध्ये नेमकं काय पाहिलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जयपाल हे आत्महत्येपूर्वी काही वेळ फोन पाहताना दिसले आहेत. त्यांनी फोनमध्ये असे काय पाहिले किंवा त्यांना कोणाचा फोन आला, ज्याने त्यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून कोणताही 'सुसाइड नोट' सापडलेली नाही. त्यांचे धाकटे चिरंजीव राहुल हे आयपीएस अधिकारी असून दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त आणि यशस्वी व्यावसायिक असूनही त्यांनी असा निर्णय का घेतला, या प्रश्नाने सर्वच थक्क झाले आहेत.
हे ही वाचा : भाजपच्या माजी नगरसेवकाने चौथे लग्न केले; नाराज मुलाने सावत्र आईला भर रस्त्यातच भोसकले
मुलाची साक्षदेखील नोंदवण्यात येणार
या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस अत्यंत सावधगिरीने तपास करत आहेत. जयपाल बल्हारा यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. आयपीएस राहुल यांच्या परतीनंतर आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवल्यानंतरच पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत. गेल्या 27 वर्षांपासून धान्य बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने रोहतक शहरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT











