honour killing : मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने जातीचा अहगंड असलेला बाप संतापला. त्यानंतर त्याने स्वत:च्या मुलीच्या संसारात विष कालवलं. तमिळनाडूमधील डिंडीगुल जिल्ह्यात ही ऑनर किलिंगची घटना घडलीये. नीळकोट्टई परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. रामचंद्रन (वय 24) असं हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे, तो एका डेअरीमध्ये काम करत होता.
ADVERTISEMENT
आरतीच्या कुटुंबीयांना लग्न मान्य नव्हतं
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्रन याची ओळख गणपतिपट्टी येथील आरतीशी झाली होती. कामाच्या निमित्ताने झालेल्या या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि गेल्या तीन वर्षांपासून दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी समाजाच्या विरोधाची पर्वा न करता काही महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं. मात्र, आरतीच्या कुटुंबीयांना हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. जातभेदाच्या विचारांमध्ये अडकलेल्या तिच्या वडिलांनी अनेकदा रामचंद्रनला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, असं आरतीचं म्हणणं आहे.
हेही वाचा : '...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला
जावयाला रस्त्यात गाठून संपवलं
लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असल्याचं या जोडप्याला वाटलं. मात्र, रविवारी सकाळी रामचंद्रन कुलीपट्टी गावाकडे कामावर जात असताना, आरतीचे वडील चंद्रन यांनी त्याचा रस्ता अडवला. जातीय अहंकार आणि रागाच्या भरात त्यांनी धारदार शस्त्राने वार करत रामचंद्रनचा घटनास्थळीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच नीळकोट्टई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलिसांनी आरोपी चंद्रनला ताब्यात घेतलं आहे. मात्र आरतीचा आरोप आहे की या खुनामागे इतर काही लोकांचाही हात आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत ती पतीचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा तिचा निर्धार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरती कल्लर समाजातील असून रामचंद्रन नायक समाजाचा होता, जो तमिळनाडूमधील मागासवर्ग (BC) मध्ये मोडतो. जातीच्या नावावर झालेल्या या क्रूर हत्येमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
