Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून विमा मिळवण्यासाठी भयंकर फसवणूक केल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला शोभेल असा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सुमारे एक वर्षापूर्वीच नैसर्गिक मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून 50 लाख रुपयांचा विमा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण कटाची मास्टरमाइंड चक्क मृताची पत्नी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणात विमा एजंट, डॉक्टर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही साथ दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका थेट LPG गॅस सिलिंडरवर, 25 दिवसांपूर्वी संपला तर काय करावं?
या प्रकरणाची सुरुवात 19 एप्रिल 2025 रोजी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका अपघाताच्या नोंदीने झाली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दहीवाड फाटा परिसरात एका काळ्या रंगाच्या थार गाडीने राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेच्या आधारे मृताची पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा विमा दावा दाखल केला होता. यासाठी रीतसर एफआयआर आणि शवविच्छेदन अहवाल देखील सादर करण्यात आला होता.
तपासात धक्कादायक सत्य; 9 आरोपींना बेड्या
विमा कंपनीला या दाव्याबाबत संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आणि तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. ज्या राजेंद्र जाधव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते, त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात एक वर्षापूर्वीच आजारपणामुळे झाला होता. केवळ विम्याची मोठी रक्कम लाटण्यासाठी त्यांच्या मृत्यूला अपघाताचे रूप देण्यात आले. या षडयंत्रात मृत राजेंद्र यांचा भाऊ, विमा एजंट, एक खाजगी डॉक्टर आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी एकूण 9 जणांना अटक केली असून त्यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
जळगाव पोलिसांच्या मते, हा केवळ एका विम्यापुरता मर्यादित प्रकार नसून विमा फसवणुकीचे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तीच्या नावावर अनेक विमा पॉलिसी असल्याचे आणि त्या माध्यमातून सुमारे 75 लाख रुपये हडपण्याची या टोळीची योजना असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून इतर कंपन्यांची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागातील भ्रष्ट साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











