Crime News : तीन मुलांच्या आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे फेसबुकवरुन प्रेमप्रकरण जुळले होते. तिचा नवरा तिचा छळ करत असल्याचे तिने आपल्या प्रियकराला सांगितलं. यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याला संपवायचं ठरवलं. विशेष म्हणजे या महिलेनेच आपल्या प्रियकराला बंदूक आणून दिली होती. दरम्यान, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाचा घाला; रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत
पतीच्या जाचाला कंटाळल्याने हत्या
उत्तर प्रदेशातील झाशी येथे 9 दिवसांपूर्वी झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील रेल्वे स्टेशनच्या मागे 1 फेब्रुवारी रोजी जगभान नावाच्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. या हत्येचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी किरण हिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृताची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि दुचाकी जप्त केली आहे.
फेसबुकवरुन जुळले प्रेम
मृत जगभान हा रेल्वेमध्ये वेंडर म्हणून काम करायचा आणि त्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा पत्नी किरणला मारहाण करत असे. याच काळात, साधारण 6 महिन्यांपूर्वी किरणची फेसबुकच्या माध्यमातून शिवकुमार लोधी या तरुणाशी ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. हे प्रेम इतके टोकाचे होते की, शिवकुमारने आपल्या हातावर किरणच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला होता. पतीचा अडसर दूर करण्यासाठी किरणने स्वतः प्रियकराला बंदूक आणून दिली आणि हत्येचा कट रचला.
अशी झाली हत्या
घटनेच्या दिवशी, 31 जानेवारीला, जगभान कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच किरणने फोन करून शिवकुमारला याची माहिती दिली. त्यानंतर शिवकुमारने आपला मित्र धर्मेंद्र याच्या मदतीने जगभानला वाटेत गाठले आणि गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र ते सतत किरणच्या संपर्कात होते. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी शिवकुमार याने यापूर्वी मध्य प्रदेशातही अशाच प्रकारे एका अन्य महिलेची हत्या केल्याचे समोर आले असून, त्याच्यावर तसा गुन्हाही दाखल आहे.
हे ही वाचा : मुंबई : तरुणी रेल्वे स्टेशनच्या शौचालयात गेली, नंतर बराच वेळ बाहेरच येईना; दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार समोर
गुन्ह्याची कबुली
झाशीच्या पोलीस अधीक्षक प्रीती सिंह यांनी सांगितले की, मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके नेमण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी किरण, शिवकुमार आणि धर्मेंद्र यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या कारवाईमुळे एका गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा छडा लागला असून आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











