ketan agarwal murder case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात 5 हजार 53 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून या हत्येच्या कटाबाबत अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला संपवण्यासाठी कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात रितेश हांगे या चेतनच्या मित्राची भूमिकाही तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रितेशला या कटाची माहिती होती आणि त्याने काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मदत केली. सुरुवातीला केतनचा मृत्यू गडावरून पडल्याने झालेला अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर या घटनेमागे कट असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. केतनला लोहगडावर बोलावण्यासाठी ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आले होते. वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून त्याला तिथे बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: मित्रांसोबत बाहेर गेल्यावर बजेटचा गेम ओव्हर! Treat देण्याची सवय महागात पडतेय?
चेतनचा मित्र रितेश हांगे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे दोषारोपपत्रात नमूद
या संपूर्ण कटात बीडचा रहिवासी आणि चेतनचा मित्र रितेश हांगे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी रितेशला माफीचा साक्षीदार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तो त्यासाठी तयार झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, रितेशने केवळ कटाची माहिती ठेवली नव्हती, तर कटाच्या काही भागात पुढाकारही घेतला. केतनचा मृत्यू अपघातासारखा दाखवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्याने आपल्या मित्रांशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले. एका मित्रामार्फत अपघात घडवून आणण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न पुढे झाला नाही. त्यानंतर सिया, चेतन आणि रितेश यांनी केतनला संपवण्यासाठी दुसरा मार्ग शोधल्याचा पोलिसांचा दावा आहे. चेतनला पोलिसांपासून वाचण्यासाठी कोणते पुरावे मागे ठेवू नयेत, मोबाईलचा वापर कसा करावा, याबाबतही रितेशकडून मार्गदर्शन झाल्याचे तपासात नमूद आहे. या प्रकरणात रितेशचा सहभाग असल्याचे दाखवणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
हेही वाचा : IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणाला नवं वळण! परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना CCTV मध्ये दिसला साहिल
सिया गोयलने चॅटजीपीटीवर काय सर्च केलं?
दोषारोपपत्रातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिया गोयलने चॅटजीपीटीवर केलेले शोध. 18 तारखेला केतनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरी जाऊन सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी सियाने चॅटजीपीटीवर भावनिक मजकुराबाबत शोध घेतल्याचे पोलिसांना आढळले. जुन्या व्हिडिओ आणि फोटोसोबत टाकण्यासाठी कॅप्शन अधिक भावनिक कसे करता येईल, याबाबतही तिने शोध घेतल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून या शोधांचे स्क्रीनशॉट मिळवले असून ते दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. केतनच्या मृत्यूनंतर सियाने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. सिया आणि चेतन यांच्यात दोन हजारांपेक्षा जास्त कॉल झाल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या संपर्कामुळे दोघांमधील संबंध आणि कटाचा तपास अधिक स्पष्ट झाला.
या प्रकरणात केतनला संपवण्यासाठी विषप्रयोग करण्याच्या शक्यतेचाही विचार करण्यात आल्याचे दोषारोपपत्रातील तपासातून समोर आले आहे. सियाच्या गुगल हिस्ट्रीमध्ये विषारी मशरूम आणि यीस्ट फर्मेंटेशनशी संबंधित शोध आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एखाद्या खाद्यपदार्थातून केतनला इजा पोहोचवता येईल का, याबाबतही शोध घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी तिचा फोन जप्त केल्यानंतर ही माहिती समोर आली. या अनुषंगाने विषारी मशरूमही तपासात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या शोधांबाबत पोलिसांनी संबंधित आरोपींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. रितेश हांगेचा सहभाग, चॅटजीपीटीवरील शोध आणि विषारी मशरूमसंदर्भातील माहिती हे दोषारोपपत्रातील तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. 5 हजार 53 पानांच्या दोषारोपपत्रातून केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील कट आणि त्यानंतरच्या घटनांबाबत पोलिसांनी तपशील मांडला आहे.
ADVERTISEMENT












