लातूर : लातूर शहरात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल त्यांनी ट्रिपल सीटवरून जाणाऱ्या तीन तरुणींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांनी वकिलांशीही हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "नोकरी गेली, आधार नाही, समाजाची भीती...", महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपात करण्याची परवानगी
नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रणिती मुसने एका वकिलाशी अरेरावीच्या भाषेत संभाषण करताना दिसत आहेत. नव्या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रणिती मुसने एका दुचाकीस्वार वकिलाला थांबवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसत आहेत. "माझा व्हिडिओ बिनधास्त कर... जा, कुठे द्यायचा ते दे... तू दीड दमडीचा वकील" अशा आक्षेपार्ह शब्दांत त्यांनी वकिलाशी हुज्जत घातली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आधी तरूणींनाही शिवीगाळ
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ काल राज्यात तुफान व्हायरल झाला होता. तीन तरुणी स्कुटीवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगानं जात होत्या. महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना मारहाण केली. व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल तरुणींना, "एकतर तिघी बसून चालल्यात, त्यात मागच्या दोघी वाकड्या बसल्या, रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? पायतन काढून हानीन तिघींना पण... मी लय घाण बोलेन, पटकन बापाला फोन लावा..." अशा खालच्या स्तरावरील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. कॉन्स्टेबलने असे अनेक शब्द वापरले, त्याचा उल्लेखही बातमी करता येत नाही. त्यानंतर आता वकिलाशी वाद घालण्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरूय.
हे ही वाचा >> तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...
सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, दोन व्हिडिओ समोर आल्यानं पोलीस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढत आहे. प्रणिती मुसने यांच्या या वर्तनामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
