Crime News : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सरधुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अका गावात गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह गावापासून काही अंतरावर असलेल्या झुडपांमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, युवकाची आधी बेदम मारहाण करून नंतर मृतदेह जाळून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
सकाळी घरात दिसलाच नाही
मृतक युवकाची ओळख शिव नरेश प्रजापती अशी पटली असून, तो 3 नोव्हेंबरपासून रहस्यमयी रीतीने गायब झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरच्या संध्याकाळी शिव नरेशने जेवण केले आणि तो मोबाईल वापरत असताना घरातील सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो घरात दिसला नाही, तेव्हापासून कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि आजूबाजूला त्याचा शोध घेतला, परंतु काहीही पत्ता लागला नाही. अखेर सरधुआ पोलीस ठाण्यात त्याच्या गुमशुदगीची (बेपत्ता असल्याची) नोंद, मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा गांभीर्य दाखवले गेले नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हे ही वाचा : आमदार निवासस्थानात धक्कादायक प्रकार, काँग्रेस आमदाराच्या खोलीत तरुण अन् तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत
झुडुपात आढळला मृतदेह
6 नोव्हेंबर रोजी गावाजवळील झुडपांमध्ये शिव नरेशचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच तणाव पसरला. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी करत सरधुआ ते अर्की जाणारा रस्ता अडवून तीव्र निदर्शने केली आणि रास्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संतप्त गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) पाठवून दिला आहे.
हे ही वाचा : 'माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार...' महिला आदिवासी नेत्याच्या मृत्यूने खळबळ
मृत्यू नेमका कसा झाला?
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिव नरेशचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याच्यासोबत नक्की काय घडले आणि या हत्येमागे नेमके कोणाचे हात आहेत, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर आणि सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












