Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाचे आपल्याच चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. तरुणीच्या वडिलांना या प्रेमसंबंधाची भनक लागताच त्यांनी प्रेमी युगुलांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी एका मांत्रिकाला 20 लाख रुपयांची सुपारी दिली. परंतु, जादू-टोण्याच्या साहाय्याने मांत्रिकाला त्या दोघांचं प्रेम संपवता आलं नाही आणि याच रागातून पीडित तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात मृत तरुणाचा काका आणि 2 चुलत भावांसह चार लोकांना अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह...
21 डिसेंबर (रविवार) रोजी येथील नजीबाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील जलालाबाद येथे रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर, तेथील स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सुरूवातीच्या तपासात, अपघातामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. मात्र, कुटुंबियांनी ही हत्या असल्याचं समजून पोलिसांकडे या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली.
प्रेमसंबंध संपवण्यासाठी मांत्रिकाला सुपारी
घटनेतील मृत तरुणाचं नाव समीर असून तो किरतपूर येथील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. संबंधित तरुणाचे त्याच्याच चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. याच कारणामुळे, समीरचे काका म्हणजेच तरुणीच्या वडिलांचा पीडित तरुणावर प्रचंड राग होता. दोघांच्या प्रेमसंबंधामुळे कुटुंबियांमध्ये कित्येक वेळा वाद झाले. त्यावेळी, समीरला त्याच्या प्रेयसीपासून दूर राहण्याची ताकीद देण्यात आली, मात्र त्या दोघांनी कधीच एकमेकांना सोडणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान, तरुणीचे वडील रफीक यांनी त्यांच्या मांत्रिक मित्रासोबत मिळून समीरला मुलीपासून दूर करण्याचं ठरवलं.
हे ही वाचा: ठाण्यातील सरकारी शाळेत 10 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य! फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह...
अखेर, तरुणाच्या हत्येची योजना आखली अन्...
मांत्रिकाने हे काम करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. यामधील 5 लाख रुपये रफीकने त्याला अॅडव्हान्स दिले होते आणि उर्वरित 15 लाख रुपये काम झाल्यानंतर त्याला दिले जाणार होते. ठरल्याप्रमाणे, मांत्रिकाने समीरवर जादू-टोण्याचे उपाय केले. मात्र, त्यातून त्यांच्या प्रेमसंबंधावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर, आरोपी मांत्रिकाने इंस्टाग्रामवर बनावट आयडीच्या मदतीने समीरशी संपर्क साधला आणि त्याला विश्वासात घेतलं. शेवटी, त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्याने समीरच्या हत्येचा प्लॅन आखला.
हे ही वाचा: अकोला हादरलं, पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही अब्रू लुटली, नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम
प्लॅननुसार, रात्री समीरला नजीजाबाद येथे बोलवून आरोपींनी त्याला त्यांच्या कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर, त्याचा स्कार्फने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना अपघात दाखवण्यासाठी समीरचा मृतदेह आणि त्याची बाईक रस्त्याच्या कडेला फेकण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











