Crime News : काहीच दिवसांपूर्वी घरात लहानग्या जिवाचे आगमन झाले होते आणि संपूर्ण कुटुंबाने या नवजात बालिकेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. मात्र, अवघ्या पाचव्या दिवशी त्याच घरातून आक्रोश आणि हंबरडा ऐकू आला. या चिमुकल्या बालिकेचा मृतदेह घरातील पाण्याच्या एका निळ्या ड्रममध्ये आढळून आला. सुरुवातीला हा एखादा अपघात असावा किंवा एखाद्या बाहेरील व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा संशय होता. परंतु, पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संशयाची सुई थेट घरातीलच सदस्याकडे वळली आणि स्वतःच्याच आईने या बालिकेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील भेलकी गावात ही दुर्दैवी घटना घडली. पाच दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह पाण्यात भरलेल्या ड्रममध्ये सापडल्याची बातमी पसरताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. सुरुवातीला पोलीस आणि गावकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता, ज्यामुळे ही घटना अत्यंत गूढ वाटत होती.
हे ही वाचा : गरोदर पत्नीच्या देखरेखेसाठी जवळच्या व्यक्तीला ठेवलं, पण त्याच्यासोबत अफेअर, मर्डरने एन्ड
दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून...
तपासादरम्यान घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि संबंधित महिलेच्या जबाबात मोठी तफावत आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी जेव्हा महिलेची कसून चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेला आधीपासूनच एक मुलगी होती. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिच्या संगोपनाची आणि जबाबदाऱ्यांची भीती तिला वाटत होती. या मानसिक आणि कौटुंबिक तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा : 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
माणूस इतका असहाय्य का होतो?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळाची पाहणी, गोळा केलेले पुरावे आणि चौकशीच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक तणाव एखाद्या माणसाला इतके असाहाय्य करू शकतात का, की तो स्वतःच्याच लेकराचा जीव घेईल? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या पुढील तपासात स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT












