Crime News : मध्यप्रदेशातील इंदोरमधून बालविवाहाची एक अत्यंत धक्कादायक आणि मानवी संवेदनांना सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 13 वर्षांच्या निष्पाप मुलीचे तिच्याच सख्ख्या आजोबांनी एका 42 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न लावून देत तिचा 'सौदा' केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या वडिलांचे आधीच निधन झाले असल्याने तिचा सांभाळ आजोबा करत होते. महिला व बालविकास विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख महेंद्र पाठक यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, यात अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत.
ADVERTISEMENT
वरपक्षाच्या वडिलांनी आजोबांसमोर एक अजब अट ठेवली होती. त्यांनी सांगितले की, ते आपल्या मुलीचे लग्न आजोबांच्या नातवाशी तेव्हाच लावून देतील, जेव्हा आजोबा बदल्यात आपल्या 13 वर्षांच्या नातीचे लग्न त्यांच्या 42 वर्षांच्या मुलाशी लावून देतील. नातवाचे लग्न जमवण्याच्या नादात आजोबांनी आपल्याच अल्पवयीन नातीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
प्रशासनाने विवाह रोखला तरीही...
प्रशासनाला या बालविवाहाची कुणकुण आधीच लागली होती, त्यामुळे 25 एप्रिल रोजी होणारा हा विवाह सोहळा अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला होता. मात्र, आरोपींचे मनसुबे काही वेगळेच होते. मुलीला सज्ञान दाखवण्यासाठी आरोपींनी तिचे बनावट गुणपत्रक (मार्कशीट) तयार केले होते, जे शिक्षण विभागाच्या चौकशीत खोटे असल्याचे सिद्ध झाले.
हे ही वाचा : उल्हासनगर : भररस्त्यात थरारक गोळीबार, सात राऊंड फायर; किती जणांचा गेला जीव?
सासरी जाण्यासाठी दबाव आणि मारहाण
यानंतर प्रशासनाची दिशाभूल करून 26 एप्रिलच्या रात्री मुलीला गुपचूप इंदोरहून उज्जैनला नेण्यात आले. तेथील चिंतामण गणेश मंदिराबाहेर अत्यंत गुप्तपणे हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. लग्नानंतर मुलगी काही दिवसांसाठी घरी परतली होती, मात्र त्यानंतर तिच्यावर सासरी जाण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला आणि नकार दिल्यावर तिच्याशी अमानुष मारहाणही करण्यात आली.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाचे वारे, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राऊ पोलिसांनी आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या बेकायदेशीर कृत्यात सामील असल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवरदेव, त्याचे नातेवाईक आणि मुलीचे आजोबा-आजी यांच्यासह एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा विवाह हा 'बालविवाह' मानला जातो आणि कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास, 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे सुनावल्या जाऊ शकतात. या अमानवी घटनेने बाल हक्कांच्या रक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
ADVERTISEMENT











