NEET मध्ये कमी मार्क पडले म्हणून मुख्याध्यापक बापाने बेदम मारलं, जखमी मुलीनं जीव सोडला तेव्हा बाप...

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 08:26 PM)

चीड आणणारी ही घटना शुक्रवारी (20 जून 2025) रात्री 9:30 च्या सुमारास घडली. साधना ही विज्ञान शाखेत बारावीत शिकत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं.

लेक तडफडत राहिली, बाप शाळेत योग दिनाला गेला...

लेक तडफडत राहिली, बाप शाळेत योग दिनाला गेला...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नीट'च्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं बापाने मारलं

point

बापाने केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

point

मुलीला तडफडत सोडून गेला बाप योग दिनाला गेला

सांगली: आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या साधना भोसले या हुशार विद्यार्थिनीला नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. मारहाण करणारे वडील स्वतः खाजगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>निवृत्त शिक्षकाला अर्ध्या कोटीला फसवलं...पैशांचा पाऊस आणि दुप्पट परताव्याच्या नादात कसा गंडा घातला?

लाकडी खुंट्याने बेदम मारलं

चीड आणणारी ही घटना शुक्रवारी (20 जून 2025) रात्री 9:30 च्या सुमारास घडली. साधना ही विज्ञान शाखेत बारावीत शिकत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं. दहावीच्या परीक्षेत तिने 95 टक्के गुण मिळवले होते, पण नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं तिचे वडील धोंडीराम भोसले संतापले. "परीक्षेत कमी गुण कसे पडले?" असं विचारत त्यांनी रागाच्या भरात साधनाला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली. 

स्वत: योगदिनाला शाळेत गेला 

धक्कादायक बाब म्हणजे, मारहाणीनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी धोंडीराम दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले. घरी परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >>"आई मी विष पिलंय, माझा मृतदेह 'इथून' घेऊन जा...", पुण्यात युवकानं स्वत:ला संपवलं, थरकाप उडवणारा घटनाक्रम

आई प्रीती भोसलेने केली तक्रार

साधनाची आई प्रीती भोसले यांनी याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर रविवारी (22 जून 2025) धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली. साधना ही आटपाडी येथील विद्यालयात राहत होती आणि दोन दिवसांपूर्वीच ती घरी आली होती. तिच्या हुशारी आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाबद्दल गावात चर्चा होती, पण फक्त एका चाचणी परीक्षेतील कमी गुणांमुळे तिचा हकनाक बळी गेला.

दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.