कुटुंबियांना वाटत होतं मुलगी लंडनमध्ये शिकतेय, पण पुण्यात मृतदेह सापडला!

मुंबई तक

02 Nov 2026 (अपडेटेड: 02 Nov 2026, 11:38 AM)

Mugdha Deshmukh death case : कुटुंबियांना वाटलं 34 वर्षीय मुलगी लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. पण मुग्धा देशमुख यांचा मृतदेह पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळला. ऑगस्टपासून त्या पुण्यात राहत असल्याचं समोर आलं असून मृत्यूचं गूढ कायम आहे.

Mugdha Deshmukh death caseMugdha Deshmukh death case

Mugdha Deshmukh death case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कुटुंबियांना वाटत होतं मुलगी लंडनमध्ये शिकतेय

point

पण पुण्यात मृतदेह सापडला!

Mugdha Deshmukh death case : पुण्यातील लोढा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. मुग्धा लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना होती. मात्र, त्या ऑगस्ट महिन्यातच लंडन सोडून पुण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे, मुग्धा पुण्यात राहत असल्याची माहिती त्यांच्या आई-वडिलांना नव्हती. कुटुंबीयांना त्या लंडनमध्येच असल्याचं वाटत होतं. दरम्यान, मुग्धा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं गूढ अद्याप उकललेलं नाही. शवविच्छेदन अहवालातूनही मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा अलर्ट, पुन्हा वादळ घोंगावणार; IMD चा अलर्ट

छत्रपती संभाजीनगर पोलिसांत नोंदवलेली बेपत्ता असल्याची तक्रार 

मुग्धा यांचे वडील अविनाश देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मुग्धा लंडनमध्ये राहून एमबीएचे शिक्षण घेत होत्या. 23 ऑक्टोबर रोजी त्यांचं आई-वडिलांशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. यावेळी त्यांनी आपल्याला एका ठिकाणी मुलाखतीसाठी जायचं असल्याचं सांगितलं आणि घाईघाईत फोन ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन सतत बंद येत होता. सुरुवातीला त्या कामात व्यस्त असतील, असा विचार कुटुंबीयांनी केला. मात्र, बराच वेळ संपर्क होऊ न शकल्याने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर वडिलांनी लंडनमध्ये राहणाऱ्या निकिता नावाच्या मुग्धा यांच्या मैत्रिणीशी संपर्क साधला आणि त्यांच्याबाबत माहिती घेण्यास सांगितलं.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या महारॅलीची भव्य सुरुवात, राहुल गांधी रामलीला मैदानाकडे रवाना, दिल्लीत काय घडतंय?

ऑगस्ट महिन्यापासून पुण्यातील एका फ्लॅटमध्ये राहत होत्या

मुग्धा यांच्या मैत्रिणीने लंडन पोलिसांशी संपर्क साधून त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. मात्र, लंडन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर कुटुंबीयांना धक्का बसला. मुग्धा ऑगस्ट महिन्यातच लंडन सोडून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याचं विवरण आणि इतर माहिती तपासण्यात आली. त्यातून मुग्धा भारतात असून पुण्यात राहत असल्याचं समोर आलं. त्या ऑगस्ट महिन्यापासून पुण्यातील लोढा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. मात्र, याबाबत कुटुंबीयांना कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर मुग्धा यांचे नातेवाईक छत्रपती संभाजीनगर पोलिसांसोबत पुण्यात पोहोचले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शिरगाव पोलीस पथकाचीही मदत घेण्यात आली. पोलीस आणि कुटुंबीय मुग्धा यांच्या फ्लॅटवर पोहोचले असता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. फोनवरही संपर्क होत नसल्याने अखेर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यावेळी आतमध्ये मुग्धा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, शवविच्छेदन अहवालातूनही मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुग्धा यांच्या मृत्यूभोवतीचं गूढ कायम आहे. ऑगस्ट महिन्यात लंडन सोडून त्या पुण्यात का आल्या होत्या, पुण्यात राहत असल्याची माहिती त्यांनी आई-वडिलांना का दिली नव्हती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी जायचं असल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, याचाही तपास होणं बाकी आहे. कुटुंबीयांना त्या लंडनमध्ये असल्याचं वाटत असताना प्रत्यक्षात त्या पुण्यातील फ्लॅटमध्ये राहत होत्या. दरम्यान, त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत. सध्या ३४ वर्षीय मुग्धा देशमुख यांच्या मृत्यूचं कारण शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.