चॉकलेटवरुन वाद, चार वर्षांच्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत ढकलले; अल्पवयीन मुलीला अटक

मुंबई तक

• 08:11 AM • 02 Nov 2026

बारा वर्षांच्या मुलीने एका साडेचार वर्षांच्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत ढकलून दिले. यामध्ये त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मंदसौरमधील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

चॉकलेटच्या वादातून दुर्दैवी घटना

point

साडेचार वर्षांच्या बालकाचा मृत्यू

Crime News : एका साडेचार वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णपाल उर्फ बाबू असे या मृत बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी चॉकलेटवरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या बारा वर्षांच्या मुलीच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. याच रागातून 24 ऑक्टोबर रोजी तिने बाबूला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले आणि पाण्याच्या टाकीत ढकलून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील शामगड येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

टाकीत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बाबूची आई शेजारी राहणाऱ्या मुलीवर रागावली होती, कारण तिने बाबूचे चॉकलेट घेतले होते. या किरकोळ वादातून मुलीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. 24 ऑक्टोबरच्या दुपारी दोनच्या सुमारास बाबू अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. संशयावरून शेजारच्या घराची झडती घेतली असता, तेथील पाण्याच्या टाकीत बाबूचा मृतदेह आढळला. मुलीने त्याला टाकीत ढकलल्यानंतर वरून झाकण लावून त्यावर दगड ठेवला असल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा : वहिनी गच्चीवर गेली अन् दीरानं साधला डाव, आठ महिन्यानंतर हादरवून टाकणारं प्रकरण उघड

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

कृष्णपाल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंब पाणीपुरीचा गाडा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. या घटनेनंतर बाबूचे आई-वडील घराला कुलूप लावून आग्रा येथे गेले आहेत, तर आरोपी मुलीचे कुटुंबही घर सोडून निघून गेले आहे. पोलिसांनी ते घर सील केले असून सध्या संपूर्ण पंजाबी कॉलनीत स्मशानशांतता पसरली आहे.

हे ही वाचा : फ्री फायरवरुन भयंकर 'गेम', अल्पवयीन मुलगी तरुणाच्या जाळ्यात अडकली, पुढं काय घडलं?

मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी सांगितले की, शामगड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलीने गुन्ह्याची कबुली दिली असून शवविच्छेदन अहवाल आणि तपासाच्या आधारे तिला न्यायालयात हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बालकांच्या मानसिक विकासाकडे आणि सोशल मीडियाच्या प्रभावाकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.