mathura crime news : मथुरा जिल्ह्यातील बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छौली गावातून आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप त्याच्याच आईवर करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 28 जून रोजी 32 वर्षीय रुची जिंदाल हिने तिचा तीन वर्षांचा मुलगा माधव याचा गळा दाबून जीव घेतला. पती कृष्ण मुरारी गुप्ता घरात नसताना ती तिच्या कथित प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी मुलगा सतत रडत असल्याने तो संभाषणात अडथळा ठरत होता. याच कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: घर घेणं म्हणजे सर्वोत्तम Investment की हा सर्वात मोठा गैरसमज?
नेमकं काय घडलं?
घटनेनंतर रुचीने मुलाच्या मृत्यूबाबत घरच्यांना आजारपण आणि औषधोपचाराचे कारण सांगितले. तिने पतीला फोन करून मुलगा आजारी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला सिम्स रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांना पोलिओचे थेंब दिल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला असावा, अशी शंका असल्याने त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रुचीनेही मृत्यू आजारामुळे झाल्याचेच सांगितल्याने त्यावेळी कोणालाही संशय आला नव्हता.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट
मात्र, जवळपास महिनाभरानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 27 जुलै रोजी पतीने पत्नीला तिच्या कथित प्रियकराशी बोलताना घटनेचा उल्लेख करताना ऐकले. त्यानंतर त्याला संशय आला आणि त्याने कॉल रेकॉर्डची पडताळणी केली. तपासात रुची आणि तिच्या कथित प्रियकरामध्ये दीर्घकाळ फोनवर संभाषण होत असल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबीयांनी तिची चौकशी केली असता, तिने त्यांच्यासमोर संपूर्ण प्रकाराची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
मुलाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बलदेव पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस आणि कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आता मुलाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. महावनचे क्षेत्राधिकारी संजीव कुमार राय यांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, संपूर्ण घटनेमागील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT












