Mumbai Crime : मुंबईच्या घाटकोपर येथे नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सासुने सुनेची हत्या करण्यासाठी तिऱ्हाईत व्यक्तीला सुपारी दिल्याची घटना आहे. सुरूवातीला हे प्रकरण लपवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला होता. यात सुनियोजित कटाचा भाग म्हणून घडवून आणलेली हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी सासून धनलक्ष्मी घानजी, मोलकरीण आणि तिच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांना अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पिंपरी-चिचवडमध्ये महिलेनं तोडला रेड सिग्नल, कारच्या धडकेत कोसळली; Video व्हायरल
मृत सुनेची सपना घानजी (वय 34) अशी ओळख समोर आली होती. तर सासू धनलक्ष्मी घानजी (वय 65) अशी ओळख समोर आली. सासूने मोलकरीण मंगला जाधव हिला सुनेला मारण्यासाठी 3 लाख रुपयांचे आमिष दाखवले होते. या कटात मंगलासोबत तिचा नवरा सुरेश, मुलगी शिवानी (वय 21) आणि मुलगा साजन (वय 19) यांचा या हत्येत समावेश होता.
सुनेला निर्दयीपणे संपवलं
रविवारी दुपारी, सासू धनलक्ष्मी वाद मिटवण्याच्या बहाण्याने सुनेच्या घरी पोहोचल्या आणि मोलकरीण व तिच्या संपूर्ण कुटुंबाला घरात बोलावण्यात आले. आरोपींनी आधी सपनाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, नंतर डोक्यात ग्लासने हल्ला करत ओढणीने तिचा गळा आवळून मारले. आरोपीने मानेवर पाय ठेवून संपवलं.
खूनानंतर प्रकरण अपघात असल्यासारखे दाखवले
या खूनानंतर आरोपीने हे प्रकरण अपघातासारखे वाटावे असे भासवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री सपनाच्या कुटुंबीयांना सांगितले की, ती बाथरूममध्ये घसरून पडली होती. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पंत नगर पोलिसांच्या पथकाला सपनाच्या मानेवर निळसर-काळे डाग आढळले. तसेच डोक्यातून रक्तस्राव झाल्याच्या खुणा आढळून आल्या. संशयितांच्या हालचाली आणि कॉल रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर पोलिसांना अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.
हे ही वाचा : घरात घुसून मुख्याध्यापिकेवर केले 27 वार, 10 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य; धक्कादायक कारण समोर
सासुकडून सुनेवर गंभीर आरोप
दरम्यान, पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, सासू धनलक्ष्मी सून सपनावर बऱ्याच दिवसांपासून रागवली होती. 2024 मध्ये सपनाने नालासोपारा पोलीस ठाण्यात तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. सपना तिचा पती आणि मुलासोबत दुबईला गेली होती. जूनमध्ये ती एकटीच परतली होती. तिच्या परतल्यानंतर सासूने तिच्यावर विवाहबाह्य संबंध आणि दारूच्या व्यसनाचा आरोप केला. या घटनेची पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT












