Nagpur Crime News : नागपूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुभाष उके (वय 40, रा. इंदिरा नगर, जाटतरोडी) याला अटक केली आहे. सुभाष हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष उके याला 17 वर्षीय पीडित मुलाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने बदला घेण्याचे ठरवले. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पीडित मुलगा मेडिकल चौक परिसरात आपल्या तीन मित्रांची वाट पाहत थांबला होता. त्याचवेळी सुभाष कारमधून तिथे आला. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने पीडित मुलगा आणि त्याच्या मित्रांना गाडीत बसवले आणि त्यांना अंभोरा येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेला.
हेही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं
निर्जन ठिकाणी आल्यावर घाबरलेल्या पीडित मुलाने सुभाषला तिथे आणण्याचे कारण विचारले. तेव्हा, "तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत," असे म्हणत सुभाषने पीडित मुलावर चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी केले. यानंतर, त्याने पीडित मुलाच्याच एका मित्राला चाकूचा धाक दाखवून पीडित मुलासोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली.
घरी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरण, प्राणघातक हल्ला आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सुभाष उकेला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











