Nashik Crime : नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव आयुष चव्हाण असून, त्याने मृत्यूपूर्वी काही मिनिटांपूर्वी इंस्टाग्रामवर आपली शेवटची पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्याने कॉलेजच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
"माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळालं"
ही दुर्दैवी घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सकाळी सुमारे 7 वाजून 45 मिनिटांनी आयुषने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिले की “मित्रांनो, ही माझी शेवटची वेळ आहे. माझ्याकडे आयुष्यात कोणतंही स्वप्न किंवा ध्येय उरलेले नाही. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे, म्हणून मी आयुष्याला अलविदा करतोय. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळालं. ”
पोलीसांनी सांगितले की आयुष हा कॉलेजमधील हुशार विद्यार्थी होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मनोमन खूप उदास दिसत होता. त्याच्या मित्रांनी सांगितले की, तो अनेकदा स्वतःला निरर्थक आणि लक्ष्यहीन असल्याचे म्हणायचा. गंगापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, “आयुषने आत्महत्येपूर्वी स्वतःच इंस्टाग्रामवर ती पोस्ट लिहिल्याचे आम्हाला समजले आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.”
प्राथमिक चौकशीत कोणत्याही दबावाचे किंवा छळाचे पुरावे आढळलेले नाहीत, मात्र पोलिस अधिकचा तपास करत आहेत. आयुषच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्याची शेवटची पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. कॉलेज प्रशासनाने या घटनेनंतर परिसरात शोकसभा आयोजित केली असून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे.
कॉलेजकडून काय सांगण्यात आलं?
कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले, “हा आमच्यासाठी अत्यंत दु:खद क्षण आहे. कोणताही विद्यार्थी मानसिक तणावाखाली असेल तर त्याने न घाबरता आपले विचार शेअर करावेत,” अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी आयुषच्या कुटुंबीयांकडून अधिक चौकशी केली असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
