डोंबिवली: लग्न ठरलेल्या मावशीचा आणि 4 वर्षाच्या भाचीचा एकाच वेळी झालेला मृत्यू, सर्पदंश मृत्यूकांड प्रकरणाचा आता उडाला भडका
Dombivli News: डोंबिवलीमध्ये सर्पदंशमुळे 4 वर्षांच्या चिमुकली आणि तिच्या मावशीचा एकाच वेळी मृत्यू झाला होता. पण या सगळ्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य उपाययोजना न केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे याचविरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवली सर्पदंश झालेल्या दोन्ही रूग्ण मुलींवर उपचार करण्यात हेळसांड केल्याचा आरोप करत मंगळवारी विविध नेत्या/पुढाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयावर खळ खट्याक् आंदोलन करून निषेध व्यक्त केला. प्रशासनाने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसह बळीचा बकरा केलेल्या डॉ. संजय जाधव यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर केली आहे.
खंबाळपाड्यात रविवारी 28 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास 4 वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची 24 वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर जिचं नुकतंच लग्नही ठरलं होतं. या दोघींना गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. या दोघींना उपचाराकरिता शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचा बेपर्वा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्या/पुढाऱ्यांनी दुर्दैवी मुलींच्या पालकांसह शास्त्रीनगर रूग्णालयात घुसून एल्गार केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
◆ योगायोगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला 2 ऑक्टोबर रोजी 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील 42 वर्षांत ही महानगरपालिका एकही सुसज्ज आरोग्य व्यवस्था असलेले रूग्णालय उभी करू शकली नाही. परिणामी सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. असलेल्या एकाही रूग्णालयात अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाही. साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेल्या महानगरपालिकेच्या रूग्णालयांत आयसीयू, मोफत सिटीस्कॅन, एमआरआय, रक्त व इतर तपासणी सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. कल्याण-डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे सर्पदंश झालेल्या 4 वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची 23 वर्षीय मावशी बबली उर्फ श्रुती ठाकूर या दोघींचा योग्य उपचारांअभावी मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा>> डोंबिवली हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश, विवाहाची ठरली होती तारीख, नंतर रुग्णालयात जाताच...
या घटनेला सर्वस्वी आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. या पूर्वीही अनेक रूग्णांचा उपचारांअभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची महानगरपालिका वाट पाहणार? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन निवेदनामार्फत भावना व्यक्त केल्या.