हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला.., नेमकं काय घडलं?

ओमकार वाबळे

30 Sep 2026 (अपडेटेड: 30 Sep 2026, 11:04 AM)

Neelam Gorhe pune bungalow : नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील बंगल्यात पहाटे तरुणाने घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला. तरुणाच्या आईने मुलाचा चोरीचा किंवा हानी पोहोचवण्याचा हेतू नसल्याचा दावा केला आहे.

Neelam Gorhe pune bungalow

Neelam Gorhe pune bungalow

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला

point

ब्रेकअपनंतर तरुण नीलम गोऱ्हे यांच्या गच्चीवर काय करत होता? FIR मुंबई Tak वर

Neelam Gorhe pune bungalow : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील (शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथील)  बंगल्यात शनिवारी पहाटे 21 वर्षीय तरुणाने घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिमांशु निवृत्ती हिरे (रा. सटाणा, जि. नाशिक) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बंगल्याच्या गच्चीवर जाण्यासाठी त्याने झाडाचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे हातोडा, पक्कड, हातमोजे, दोरी आणि स्प्रे अशा वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच गच्चीवर ठेवलेला घरातील जुना थर्मासही त्याच्या बॅगेत सापडला. या वस्तूंमुळे तरुण बंगल्यात नेमका कोणत्या उद्देशाने शिरला होता, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

बंगल्याच्या गेटजवळील झाडावरून गच्चीवर चढला 

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हिमांशु बंगल्याच्या गेटजवळील झाडावरून चढून गच्चीवर पोहोचला. त्यानंतर त्याने पाण्याचा कॉक बंद केला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बंगल्यावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात पाणी येत नसल्याचे आले. त्यानंतर तो गच्चीवर पाण्याची टाकी पाहण्यासाठी गेला असता त्याला हातमोजे घातलेला आणि पाठीवर तपकिरी रंगाची बॅग असलेला तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याला पाहताच तरुण पळण्याचा प्रयत्न करू लागला. सुरक्षारक्षकाने खाली असलेल्या अन्य कर्मचाऱ्याला वर बोलावले आणि दोघांनी मिळून त्याला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव हिमांशु हिरे असून आपण सटाण्याचा रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र, तो बंगल्यात का आला होता? याबाबत त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही.

हेही वाचा : गर्भवती काकीसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा, तरुणाला वेगळाच संशय आला अन् घडंल थरारक हत्याकांड

यानंतर त्याच्याकडील राखाडी रंगाची बॅग तपासण्यात आली. त्यामध्ये लोखंडी हातोडा, भगव्या रंगाची लोखंडी पक्कड, 10 मीटर लांबीची पिवळी नायलॉनची दोरी आणि इंग्रजी अक्षरात नाव असलेला स्प्रे आढळला. गच्चीवर जुन्या सामानामध्ये ठेवलेला घरात पूर्वी वापरला जाणारा थर्मासही त्याच्या बॅगेत सापडला. या वस्तू सापडल्यानंतर सुरक्षारक्षकाला तरुण घरफोडीच्या उद्देशाने बंगल्यात शिरल्याचा संशय आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून या बंगल्यातच का प्रवेश केला? याचे स्पष्ट उत्तर मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात त्याच्यावर घुसखोरी आणि घरफोडीशी संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

हिमांशुच्या आईची डॉ. नीलम गोऱ्हे यांना भावनिक साद

दरम्यान, हिमांशुच्या आईने माध्यमांसमोर येत डॉ. नीलम गोऱ्हे यांना भावनिक साद घातली आहे. अभ्यास आणि मित्रांच्या ताणामुळे हिमांशु मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. तो केवळ तिथे जाऊन झोपला होता आणि त्याचा चोरी करण्याचा किंवा कोणाला इजा करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा त्याच्या आईने केला आहे. दुसरीकडे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तरुणाकडे सापडलेल्या वस्तू आणि त्याने पाण्याचे कनेक्शन बंद केल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले असून त्याच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हिमांशु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएस्सी डेटा सायन्सच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून यापूर्वी त्याने बीएस्सी मॅथ्स केले आहे. वडिलांचे निधन, परीक्षेतील अडचणी आणि ब्रेकअपमुळे तो अस्वस्थ असल्याची माहिती त्याच्या मित्रांकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, तो डॉ. गोऱ्हे यांच्या बंगल्यातच का गेला? आणि त्याच्याकडील वस्तूंचा नेमका उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.