कल्याण: मुंबईमध्ये गाजत असलेल्या नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता नवा धक्कादायक वळण मिळाले आहे. ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यामुळे एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली. याच प्रकरणी पोलिसांनी कल्याणमधील ड्रग्स पुरवठा करणाऱ्या आनंद पटेलला अटक केली होती. याच आनंद पटेलच्या कुटुंबाचा आता गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला असून, त्याचे वडील लखन पटेल हे कल्याण-डोंबिवली परिसरातील कुख्यात रेशनिंग माफिया असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेटा नंबरी तर बाप दस नंबरी असल्याची चर्चा कल्याण-डोंबिवलीत होत आहे.
ADVERTISEMENT
आधी मुलगा अटकेत नंतर बापाचेही गुन्हे आले समोर...
आनंद पटेलच्या अटकेनंतर मोहन हाइट्स या कल्याणमधील उच्चभ्रू परिसरात खळबळ उडाली आहे. आधीच मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकल्याने धक्का बसलेल्या रहिवाशांना आता त्याच्या वडिलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दुहेरी धक्का बसला आहे.
हे ही वाचा>> मुंबई : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक प्रकार, पाच जण अटकेत
लखन पटेल याच्यावर कल्याण आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. सरकारी रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार, अफरातफर आणि तस्करी हे त्याचे प्रमुख गुन्हे असून, गरीबांसाठी असलेले धान्य खुले बाजारात चढ्या दराने विकल्याचे अनेक प्रकरणे त्याच्यावर आहेत, अशी माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्यावर MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला कारागृहातही डांबले होते. एवढेच नव्हे तर, रेशनिंग धान्याची संघटित तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत. तपासात असेही उघड झाले आहे की, लखन पटेलने रेशनिंग धान्याच्या काळाबाजारासाठी एक मोठे नेटवर्क उभे केले होते.
हे ही वाचा>> मित्र म्हणाले, “हा मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही…'', तरुणाने 6 वर्षांच्या मुलाला घातले नवे कपडे अन्...
या नेटवर्कमध्ये अनेक वाहने, गोदामे आणि सहकारी गुन्हेगारांचा समावेश होता. याशिवाय, जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन, भारतीय न्याय संहिता कलम 420 आणि 406 अंतर्गत फसवणूक व विश्वासघात, तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. कारवाईसाठी गेलेल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि परिमंडळ-3 पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या विविध ठिकाणांवरील गोदामांवर छापे टाकून लाखो रुपयांचे तांदूळ आणि गहू जप्त केले आहेत. कोळसेवाडी, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.
दरम्यान, नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आनंद पटेलच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या अधिक वेगाने सुरू असून, संबंधित गुन्हेगारी जाळ्याचा विस्तार उघड होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











