Love Marriage केलं अन् अवघ्या 24 तासात नवरदेवाने घेतला गळफास, नवरी बेडवर मृतावस्थेत!

मुंबई तक

• 07:00 AM • 23 Sep 2026

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये लग्नाच्या अवघ्या २४ तासांत नवदाम्पत्याचा मृत्यू झाला. नवरदेवाचा मृतदेह फासावर, तर नवरी बेडवर मृतावस्थेत आढळली.

newlywed couple death groom found hanging wife dead uttar pradesh crime news

लग्नानंतर 24 तासातच नवरा-नवरीचा मृत्यू

Google CTA

सिद्धार्थनगर: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात लग्नाच्या अवघ्या 24 तासांत नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाचा मृतदेह खोलीतील छताच्या कडीला साडीच्या फासाने लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर नवरी बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. या घटनेमुळे विवाह सोहळा पार पडलेल्या घरात शोककळा पसरली आहे. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

  • उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बांसी कोतवाली क्षेत्रातील जनियाजोत गावात ही घटना घडली.
  • देशराज चौहान (वय २१) आणि अनिता चौहान यांचा मृत्यू झाला.
  • मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत आढळले.
  • देशराजचा मृतदेह छताच्या कडीला साडीच्या फासाने लटकलेल्या अवस्थेत होता.
  • अनिता बेडवर मृतावस्थेत पडलेली होती.

घटनेची माहिती मिळताच बांसी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पाहणी करण्यात आली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रेमसंबंधानंतर मंदिरात केला होता विवाह

देशराज आणि अनिता यांच्यात बराच काळ प्रेमसंबंध होते. देशराज हा जनियाजोत गावचा, तर अनिता जोगिया परिसरातील रहिवासी होती.

दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या लग्नाचे ठरवले होते. देशराज मुंबईहून गावी परतल्यानंतर अनिता त्याच्या घरी आली होती. त्यानंतर सोमवारी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने बांसी येथील टेकधर मंदिरात त्यांचा विवाह पार पडला. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका दिवसात दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी खोलीचा दरवाजा उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

लग्नानंतर घरातील नातेवाईक जेवण करून छतावर झोपण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी देशराजची मावशी मीनाक्षी दोघांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीजवळ गेली.

आवाज दिल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा हलकेच ढकलला असता तो उघडला. खोलीत देशराज फासावर लटकलेला, तर अनिता बेडवर मृतावस्थेत आढळली. या दृश्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

आजारपणाचा उल्लेख; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

अनिताच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, खोलीच्या दरवाजाला आतून कडी नव्हती. दोन्ही कुटुंबांची लग्नाला संमती होती आणि कोणताही वाद नसल्याचेही तिने सांगितले. देशराजने लग्नापूर्वी आपल्याला टायफॉइड झाल्याचे सांगितले होते. मात्र, त्याने उपचार घेण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे. तथापि, या आजाराचा दोघांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून तपास सुरू

बांसी क्षेत्राचे सीओ शुभेंदू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली असून, मृत्यूचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.