मर्डर, मिसळ आणि लग्नाचा किस्सा ! संपूर्ण चार्जशीट मुंबई Takवर!

मुंबई तक

22 Sep 2026 (अपडेटेड: 22 Sep 2026, 09:43 AM)

soya goyal ketan agarwal case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी 5,053 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगेविरोधातील पुरावे, चॅट, सीसीटीव्ही आणि साक्षीदारांची माहिती चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आली आहे.

soya goyal ketan agarwal case

soya goyal ketan agarwal case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 5,053 पानांची चार्जशीट

point

सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगेविरोधात महत्त्वाचे पुरावे

Siya Goyal Ketan Agarwal Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल 5,053 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटनुसार सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात विविध पुरावे आणि साक्षीदारांची माहिती नोंदवण्यात आली आहे. तपासादरम्यान व्हॉट्सॲप चॅट, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्यात आले. पोलिसांच्या तपासात सियाच्या घरातील बेडरूममधील ड्रॉवरमध्ये लपवलेला आणि खराब केलेला फोनही सापडला. हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्यातून चॅट, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर संभाषणांचा डेटा रिकव्हर करण्यात आला. याच तपासात काही महत्त्वाच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीचाही तपास करण्यात आला.

हे वाचलं का?

माही नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

चार्जशीटमधील माहितीनुसार, केतनला लोहगडावर नेण्याच्या योजनेबाबत वेगवेगळ्या तारखांचा विचार करण्यात आला होता. 31 मे रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले होते. त्यावेळी ठिकाणाची पाहणी करण्यात आल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. त्यानंतर 6 जूनला बालीला जाण्याचा बेत होता. मात्र हा बेत रद्द झाल्यानंतर 19 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन करण्यात आले. यानंतर 18 जूनला केतनला लोहगडावर नेण्यासाठी माही नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. सिया आणि चेतन हे अकाउंट चालवत असल्याचा आरोप चार्जशीटमध्ये आहे. या अकाउंटच्या माध्यमातून केतनशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर केतन 18 जूनला लोहगडावर गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी त्याला कड्यावरून ढकलण्यात आले. त्यानंतर चेतन एका ढाब्यावर थांबला आणि त्याने मिसळ खाल्ल्याचेही तपासात समोर आले आहे.

गुगल सर्च हिस्ट्रीमध्येही पोलिसांना काही महत्त्वाच्या नोंदी सापडल्या

सियाच्या फोनमधून मिळालेल्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्येही पोलिसांना काही महत्त्वाच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये सोनम रघुवंशी प्रकरणाशी संबंधित माहिती, लोहगड आणि लोहगडावरील रात्रीच्या ठिकाणांची माहिती शोधल्याचा उल्लेख आहे. तसेच लोहगडावर याआधी कोणी पडले आहे का, यासंदर्भातील बातम्याही शोधण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणात राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरातील एक फोटोही महत्त्वाचा ठरला. या फोटोमध्ये सिया आणि चेतन एकमेकांच्या शेजारी उभे असून त्यांच्या गळ्यात हार असल्याचे दिसत असल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. या फोटोच्या आधारे पोलिसांनी दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा आणि केतन हा त्यांच्या मार्गातील अडथळा असल्याचा तपासाचा एक भाग मांडला आहे. मात्र दोघांनी अधिकृतपणे लग्न केल्याचा पुरावा पोलिसांना सापडलेला नसल्याचेही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात रितेश हांगे याचीही भूमिका तपासात समोर आली. तो चेतनचा मित्र असून, केतनच्या हत्येच्या कटाची माहिती असण्यासोबतच त्याने या कटाच्या नियोजनात मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने अन्य व्यक्तीच्या माध्यमातून केतनला मारण्याचे किंवा अपंग करण्याचे पर्याय तपासण्याचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख आहे.

चार्जशीटमध्ये सियाच्या चॅटजीपीटी सर्चचाही उल्लेख करण्यात आला आहे. केतनला कोणत्या पद्धतीने मारता येईल, विष देण्याबाबत तसेच पोलिसांच्या चौकशीदरम्यान स्वतःला कसे हाताळावे, यासंबंधी शोध घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हत्येनंतर सोशल मीडियावर कोणत्या प्रकारच्या पोस्ट कराव्यात, भावनिक संदेश कसा तयार करावा, याचाही शोध घेतल्याचा उल्लेख आहे. तपासात डिलीट केलेले चॅट, बनावट माही अकाउंटशी संबंधित माहिती, फॉरेन्सिक डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुनर्रचना यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे 80 ते 85 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यापैकी तीन महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या साक्षीदारांनी घटनाक्रमासंदर्भात महत्त्वाची माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आता 5,053 पानांच्या चार्जशीटमधील पुरावे, साक्षीदार आणि आरोपींची भूमिका यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे.