Crime News : एका 99 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करुन मृतदेह घरातीलच एका लोखंडी पेटीत लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोगिंदर कौर असं या मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या वृद्ध महिलेचा मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो. दोन दिवसांपासून आजींनी दूध घेतले नसल्याचे दूधवाल्याने मुलाला फोन करुन सांगतिले. यानंतर वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा झाला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका व्यसनी तरुणाने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?' ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. जोगिंदर कौर या घरी एकट्याच राहत होत्या, तर त्यांचा मुलगा सुखदेव सिंह हा ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. दोन दिवसांपासून दूधवाल्याने आजींनी दूध घेतले नसल्याची माहिती दिल्यानंतर संशय बळावला. परदेशात असलेल्या मुलाने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एक अनोळखी तरुण घरात शिरल्याचे दिसले आणि त्यानंतर आजी कुठेही कॅमेऱ्यात दिसल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने तातडीने गावकऱ्यांना आणि पोलिसांना संपर्क साधला.
लोखंडी पेटीत आढळला मृतदेह
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची झडती घेतल्यानंतर एका लोखंडी पेटीत जोगिंदर कौर यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्रे फिरवून गावातीलच डॅनियल नावाच्या तरुणाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या उद्देशाने घरात शिरून आजींची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 90 हजार रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे.
हे ही वाचा : पुणे हादरलं! आईच्या मित्राचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत सोडतो सांगून असं कारमध्ये बसवलं अन्...
डॅनियलविरुद्ध हत्येचा गुन्हा
पोलिसांनी सांगितले की, आरोपी डॅनियलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अमली पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असून, व्यसनासाठी पैसे मिळवण्याच्या नादात त्याने हे क्रूर कृत्य केले आहे. 99 वर्षांच्या वृद्धेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT











