Crime News : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या पतीपासून वेगळे होऊन गेल्या चार वर्षांपासून प्रियकरासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या धनेश्वरी विश्वकर्मा या महिलेची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या मंगळसूत्राला सौभाग्याचे लेणे मानले जाते, त्याच मंगळसूत्राने गळा आवळून विकेश बरेठ याने धनेश्वरीचा जीव घेतला. 1 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, धनेश्वरीचे लग्न मनोज विश्वकर्मा यांच्याशी झाले होते आणि त्यांना तीन मुलेही आहेत. मात्र, कौटुंबिक वादामुळे ती पतीला सोडून माहेरी राहू लागली होती. याच काळात तिची ओळख विकेश बरेठशी झाली आणि दोघेही किरोडीमलनगर भागात पती-पत्नीसारखे राहू लागले. मात्र, धनेश्वरीचा पतीसोबत कायदेशीर घटस्फोट झाला नसल्याने विकेशसोबत तिचे लग्न होऊ शकत नव्हते. याच मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत आणि हेच त्यांच्यातील तणावाचे मुख्य कारण बनले होते.
हे ही वाचा : अशी बायको कुणाच्याही नशिबात येऊ नये! संपूर्ण प्रकरण वाचून उडेल थरकाप
नैसर्गिक मृत्यूचा बनाव
घटनेच्या दिवशी घरात जेवण बनवण्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. धनेश्वरीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने ती वेळेवर स्वयंपाक करू शकली नाही, ज्यावरून विकेशने तिला रागावले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या धनेश्वरीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती जात असताना विकेशने मागून तिचे मंगलसूत्र पकडून ते जोराने ओढले. या झटापटीत गळा आवळला गेल्याने धनेश्वरी जागीच बेशुद्ध पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. आरोपीने सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला होता, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा : तरुणीवर अत्याचार करुन गेला तुरुंगात, जामिनावर बाहेर येताच पुन्हा त्या तरुणीला गाठलं अन् केलं कांड
अखेरीस पितळ उघडे पडले
रायगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शशिमोहन सिंह यांनी सांगितले की, आरोपी विकेश बरेठ याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तांत्रिक पुरावे आणि पोस्ट मार्टम अहवालामुळे त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कडक विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. एका जुन्या नात्यातून बाहेर पडून सुखाच्या शोधात असलेल्या धनेश्वरीचा शेवट अशा प्रकारे तिच्याच प्रियकराच्या हातून झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











