Crime News : एका कंत्राटदाराने बँक कर्मचारी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला घरी नेऊन आपल्या कुटुंबाशीही भेट घडवून आणली होती, मात्र जानेवारी 2026 मध्ये त्याने दुबईत दुसऱ्याच तरुणीशी साखरपुडा केल्याचे उघड झाले. पीडितेने याला विरोध केला असता, आरोपीने 26 फेब्रुवारी रोजी तिच्या घरात घुसून मारहाण केली आणि तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कंत्राटदाराच्या भावावरही धमकावल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ
पीडितेचा असा दावा आहे की, आरोपीच्या वडिलांची मोठी राजकीय पार्श्वभूमी असून पोलीस कर्मचाऱ्यांशी असलेल्या संबंधांमुळे पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. गेल्या एका महिन्यापासून पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक पोलीसांचे आणि डीसीपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. या विलंबाचा फायदा घेत महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज आता नष्ट झाले आहेत, परंतु मोबाईल चॅट्स आणि सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड्स) यांसारखे पुरावे अद्याप उपलब्ध असल्याचे तरुणीने सांगितले आहे.
हे ही वाचा : गरोदर वहिनी घरात एकटीच होती, दीर गुपचूप घरात घुसला; पण शेवटी कोणाचा जीव गेला?
जबरदस्तीने गर्भपात
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने गेल्या अडीच वर्षांत पीडितेवर अनेकदा अत्याचार केले, ज्यामुळे ती एकदा गर्भवती देखील राहिली होती. लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने कामाचे कारण सांगून टाळाटाळ केली आणि पीडितेचा जबरदस्तीने गर्भपातही घडवून आणला. पोलिसांच्या असहकार्यामुळे हताश झालेली पीडिता आता थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार आहे.
हे ही वाचा : 'अहो, बॅग पडली..' नवऱ्याने बाईक थांबवली अन् फसला, 23 वर्षीय बायकोने कसा काढला नवऱ्याचा काटा?
कारवाईकडे लक्ष
दरम्यान, या प्रकरणी डीसीपी (महिला सुरक्षा) अनुकृति शर्मा यांनी हस्तक्षेप केला असून संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या तपासात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तरीही महिनाभर तक्रार प्रलंबित राहिल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या गंभीर प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











