Crime News : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 23 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली. यानंतर या महिलेने ही घटना लुटीचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली, तेव्हा या धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला.
ADVERTISEMENT
हे संपूर्ण प्रकरण अटेर पोलीस ठाणे परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी काही बदमाशांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती मिळाली होती. निलेश (27 वर्षे) असे मृताचे नाव असून, तो आपली पत्नी रुबी आणि मुलासह दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. घटनेनंतर रुबीने पोलिसांना सांगितले की, ते जमना गावातून खरिका येथे जात होते. वाटेत अचानक तिची बॅग रस्त्यावर पडली, त्यामुळे तिने पतीला गाडी थांबवण्यास सांगितले. निलेशने गाडी थांबवली आणि रुबी बॅग उचलण्यासाठी खाली उतरली, तेव्हाच मागून दोन अज्ञात व्यक्ती आल्या आणि त्यांनी तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सुरुवातीला हत्येचा गुन्हा
रुबीने सांगितलेल्या या कथेच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीला हे प्रकरण लूट आणि हत्येचे वाटत होते, परंतु तपासादरम्यान पोलिसांना काही गोष्टींविषयी शंका आली. भिंडचे पोलीस अधीक्षक असीत यादव यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान ही महिला वारंवार आपले जबाब बदलत होती आणि त्यात अनेक विसंगती आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी अधिक कडकपणे चौकशी केली असता हळूहळू सत्य समोर आले.
हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?
सात वर्षांचे प्रेमसंबंध
तपासात असे निष्पन्न झाले की, रुबीचे तिच्याच एका नातेवाईकासोबत, विशाल विमलसोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही या दोघांमधील संवाद सातत्याने सुरू होता. ते व्हॉट्सॲप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहायचे. काळानुसार रुबीला वाटू लागले की तिचा पती निलेश त्यांच्या नात्यात अडथळा ठरत आहे. त्यामुळे तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा कट रचला.
हे ही वाचा : नागपूर: हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडितेनं ब्लँकेटनं गळफास घेत संपवलं जीवन; सासरच्यांकडून सुनेचा हुंडाबळी
'असा' रचला कट
नियोजनानुसार, घटनेच्या दिवशी रुबीने ठरलेल्या ठिकाणी जाणूनबुजून आपली बॅग खाली पाडली. तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगताच, तिथे आधीच दबा धरून बसलेला तिचा प्रियकर विशाल विमल आणि त्याचा साथीदार राजेश तिथे पोहोचले. संधी मिळताच त्या दोघांनी निलेशवर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर रुबीने संपूर्ण घटनाक्रम अशा प्रकारे मांडला, जणू काही ही लुटीची घटना असावी. मात्र, पोलिसांचा तपास आणि तांत्रिक पुराव्यांनी तिचा हा कट उघडकीस आणला.
हे ही वाचा : भयंकर! जालन्यात आईला मेसेज केल्याच्या रागातून मुलाने मित्राचीच केली हत्या, हादरवून टाकणारी घटना
दोघांना अटक, एक फरार
पोलिसांनी रुबी आणि तिचा प्रेमी विशाल विमल यांना अटक केली आहे. दरम्यान, या हत्येत सामील असलेला तिसरा आरोपी राजेश अद्याप फरार असून, पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 12 बोअरचा देशी कट्टा, रिकामी काडतुसे, नंबर नसलेली बाईक आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक असीत यादव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. नुकतेच मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातही असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे एका महिलेने आपल्या प्रेमीसोबत मिळून सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या घडवून आणली होती. तिथेही सुरुवातीला ही लुटीची घटना असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र नंतर सत्य समोर आले.
ADVERTISEMENT











