Dharashiv Crime News, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोरडा गावात प्रेमप्रकरणातून अपहरण आणि हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या घरात घुसून तिच्या आईला आणि बहिणीला मारहाण करत धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर प्रियकराकडून तरुणीला जबरदस्तीने एर्टिगा कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
प्रेमप्रकरणातून वाद; घरात घुसून प्रेयसीच्या आई-बहिणीवर हल्ला
कळंब तालुक्यातील बोरडा गावातील एका तरुणीचे अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादानंतर अभिजीतने आपल्या तीन साथीदारांसह तरुणीच्या घरी धडक दिली. यावेळी आरोपींनी तरुणीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर तिच्या बहिणीवर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर कुटुंबीयांसमोरच तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर ओढत एर्टिगा कारमध्ये बसवले आणि आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा : पुण्यात खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले दोन मानवी पाय, पोलिसांनी केला धक्कादायक उलगडा
पळून जाताना वाहनांना धडक; दोघे गंभीर जखमी
आरोपींनी कळंब शहरातून भरधाव वेगाने गाडी पळवली. यावेळी रस्त्यात येणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना कारने धडक दिली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपींचा पाठलाग सुरू केला.
अंबाजोगाईत पोलिसांसमोर अर्धा तास हायव्होल्टेज ड्रामा
पोलिसांनी अंबाजोगाई परिसरात एर्टिगा कारला अडवले. मात्र, पोलिसांना पाहताच मुख्य आरोपी अभिजितने हातात धारदार कोयता घेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘एकतर मी या मुलीला संपवतो किंवा स्वतःला संपवतो,’ अशी धमकी देत त्याने पोलिसांसमोर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा : मुलीचा पाठलाग जिव्हारी, तरुणाचा ठरवून काटा काढला, तुळजापुरात थरार
पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांची धाडसी कामगिरी
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने कारवाई केली. यावेळी पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घातली. या झटापटीत आरोपीच्या हातातील कोयत्याच्या वाराने गणेश वाघमोडे जखमी झाले. मात्र, पोलिसांनी अखेर मुख्य आरोपी अभिजित ऊर्फ तन्या नवाट याला जेरबंद केले. अपहरण झालेल्या तरुणीचीही सुटका करण्यात आली.
मुख्य आरोपी अटकेत; तीन साथीदार फरार
या प्रकरणातील आरोपींची नावे
1. अभिजीत ऊर्फ तन्या अर्जुन नवाट, रा. कोठळवाडी - अटकेत.
2. किरण भागवत तुपारे, रा. बोरगाव, ता. कळंब - फरार.
3. अजय रामकिसन माने, रा. परळी रोड बायपास, कळंब - फरार.
4. साया, पूर्ण नाव अजून समोर आलेले नाही - फरार.
मुख्य आरोपी अभिजीतला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तरुणीची सुटका करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT












