मुलीचा पाठलाग जिव्हारी, तरुणाचा ठरवून काटा काढला, तुळजापुरात थरार
Tuljapur Crime News : तुळजापुरात समीर पटेल या तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून, अरबाज सैयद याने मारहाणीचा घटनाक्रम सांगितला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीचा पाठलाग जिव्हारी
तरुणाचा ठरवून काटा काढला, तुळजापुरात थरार
Tuljapur Crime News : तुळजापुरात तरुणीचा पाठलाग केल्याच्या आरोपातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समीर पटेल असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा मित्र अरबाज सय्यद यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यासह आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण आणि एका तरुणीचा पाठलाग केल्याच्या आरोपातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बेदम मारहाण झाल्याने समीरचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण समीर आणि अरबाज यांना घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांना एका ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. अरबाजने दिलेल्या माहितीनुसार, त्याला काही जणांनी दुचाकीवरून नेलं. सुरुवातीला त्याला एका मुलीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर मारहाण सुरू करण्यात आली. मोबाईलचा पासवर्ड उघडून त्याची तपासणी करण्यात आली. मात्र, मोबाईलमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळलं नसतानाही मारहाण सुरूच ठेवण्यात आली. जवळपास 30 जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा अरबाजने केला आहे. त्याला बराच वेळ मारहाण करण्यात आली. त्याने पाणी मागितलं, मात्र मारहाण सुरूच राहिली. त्याचवेळी समीर पटेल यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला.
हेही वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला माणुसकीचा हात; अशोक ठोंबरे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप
मारहाणीनंतर समीर आणि अरबाज यांना जखमी अवस्थेत भारतीय बुवा मठाजवळील पार्किंग परिसरात टाकून देण्यात आलं. समीरचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपींनी दोघांना तिथे सोडल्याचं अरबाजने सांगितलं. त्यावेळी आपले डोळे बंद होते आणि केवळ आवाज ऐकू येत होता, असंही त्याने सांगितलं. आरोपी निघून गेल्यानंतर अरबाजने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मामाच्या घरी पोहोचला. तिथून नातेवाइकांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याला पुढे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, समीरचा भाऊ आणि अरबाजच्या नातेवाइकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. समीर आणि अरबाज यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने संरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. समीरचा कोणत्याही मुलीशी संबंध नसल्याचंही त्याच्या नातेवाइकांनी सांगितलं आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडे आलेल्या फिर्यादीत मृत तरुण एका मुलीला त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात यापूर्वी दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांच्या बैठका झाल्या होत्या. संबंधित तरुणाला समजही देण्यात आली होती. मात्र, पुन्हा असाच प्रकार घडल्याने मुलीच्या बाजूच्या नातेवाइकांनी आणि संबंधित व्यक्तींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला, असं प्राथमिक तपासात समोर आल्याचं पुंडकर यांनी सांगितलं. या प्रकरणात चार जणांची आरोपी म्हणून नावं निष्पन्न झाली असून, त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम आणि संजय जाधव यांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. समीर आणि त्याच्या मित्राला घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेलं वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. प्रेमप्रकरणातून झालेला वाद की तरुणीचा छळ केल्याच्या आरोपातून हा हल्ला झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
