Crime News : एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पित्यासह सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी या गुन्ह्याची वाच्यता न करण्यासाठी पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, तिचा आधार कार्डमधील जन्मदिनांक बदलून बनावट कागदपत्रे तयार केली आणि तिला सज्ञान व विवाहित असल्याचे भासवून तिची प्रसूती घडवून आणली. यानंतर जन्माला आलेले बाळ दुसऱ्याच व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले. छत्तीसगडमधील रायपूर येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
गर्भपातानंतरही अत्याचार सुरुच
पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीवर तिच्या बापाने सुरुवातीला एका नातेवाईकाच्या घरी अत्याचार केला. यानंतर ही पीडिता गरोदर राहिल्याचे समजताच, तिच्या मावशीने ही माहिती तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी मावशीच्या मदतीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात घडवून आणला. मात्र, यानंतरही तिच्यावर अत्याचार सुरूच राहिले, ज्यामुळे 2025 मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली.
हे ही वाचा : बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला, प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला
दुसऱ्यांदा गरोदर राहिली अन्...
दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर, तिच्या पित्याने तिला एका ओळखीच्या महिलेच्या घरी पाठवले. त्या महिलेने तिला सुरक्षित प्रसूतीचे आश्वासन देऊन इतरत्र ठेवले. प्रसूतीसाठी रायपूर येथील वासुदेव रुग्णालयात दाखल करताना आरोपींनी तिच्या आधार कार्डमध्ये फेरफार करून तिचे वय वाढवले आणि ती विवाहित असल्याचे खोटे सांगून कागदपत्रे सादर केली. रुग्णालयात तिची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली आणि एका मुलाचा जन्म झाला. जन्मानंतर डॉक्टर, पीडितेचा बाप आणि इतर साथीदारांनी मिळून या नवजात बाळाला दुसऱ्याच एका व्यक्तीकडे सोपवून दिले.
हे ही वाचा : तीन वर्षांचं लेकरु बोअरवेलमध्ये पडलं, 3 तास रेस्क्यू, शेवटी असं काही घडलं की...VIDEO
'असं' बाहेर आलं प्रकरण
पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत पोलिसांनी तत्परतेने मुख्य आरोपी बापासह एकूण सहा जणांना गजाआड केले आहे. या कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












