Crime News : चंदीगडमधील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या सेक्टर 22 परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्याच वडिलांची गोळी झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख चंदीगड पोलिसांत कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल नितीन अशी झाली आहे. भल्या पहाटे घडलेल्या या हत्याकांडामुळे चंदीगड पोलीस दलासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
'घुसखोरांनी केली वडिलांची हत्या'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 च्या सुमारास त्यांना सेक्टर 22 मधील एका घरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता हेड कॉन्स्टेबल नितीन यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे दिसून आले. सुरुवातीला आरोपी मुलाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घरात काही अनोळखी घुसखोरांनी प्रवेश करून वडिलांची हत्या केली आणि ते पसार झाले, असा बनाव त्याने रचला होता.
हे ही वाचा : शिक्षिकेच्या प्रेमकहाणीचा शाळेतच झाला भीषण अंत, नाराज बॉयफ्रेंडने केलं होत्याचं नव्हतं
पोलिसी खाक्या दाखवताच...
मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि मुलाच्या जबाबात आढळलेली तफावत यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर आपणच वडिलांवर गोळी झाडल्याचे त्याने मान्य केले. या घटनेच्या वेळी घरात मृत नितीन, त्यांची पत्नी आणि आरोपी मुलगा हे तिघेच उपस्थित होते. विशेष म्हणजे आरोपीची आई देखील पोलीस विभागातच हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
हे ही वाचा : अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी
वादामागचे मुख्य कारण काय?
चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल कोणाचे होते आणि या वादामागचे मुख्य कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT












