व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण 180 अंशात बदललं, आधी सुनेवर ठपका आता वेगळं वळण!

मुंबई तक

24 Sep 2026 (अपडेटेड: 24 Sep 2026, 04:28 PM)

कानपूरमधील कोट्याधीश फार्मा व्यापारी विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी मुलगा सुब्रतने वडिलांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले.

Vineet Minocha murder case

Vineet Minocha murder case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण 180 अंशात बदललं

point

आधी सूनेवर ठपका आता वेगळं वळण!

Vineet Minocha murder case :औषध विक्रेते आणि कोट्याधीश व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांचा मुलगा सुब्रत मिनोचा याने वडिलांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सुब्रतने या हत्येसाठी पत्नी शालू मिनोचा हिला जबाबदार ठरवले होते. मात्र अटकेची शक्यता लक्षात आल्यानंतर त्याने आपला जबाब बदलला आणि हत्येत शालूचा कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : दुष्काळावरील चर्चेसाठी अधिवेशन बोलवा, 'त्या' 31 हजार कोटींचा हिशोब द्या; ठाकरेंचे सरकारला बेधडक सवाल

पोलिसांकडून शालूला अद्याप क्लीन चिट नाही

सुब्रतची चौकशी शालू आणि जुना घरगडी विशाल गौतम यांच्यासोबत करण्यात आली. विशालनेच विनीत यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दुसरीकडे, विशालनेही आपला आधीचा जबाब बदलत सुब्रतनेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगितले. शालूला आरोपी ठरवण्यास सांगितल्याचा दावाही विशालने केला आहे. पोलिसांनी मात्र शालूला अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.

हेही वाचा : मुंबईची खबर : गणपती विसर्जनाला मेट्रो-3 रात्रभर सुरु राहणार? काय आहे निर्णय?

चौकशीदरम्यान सुब्रत आणि शालू यांना समोरासमोर बसवले 

पोलिस आयुक्त रघुबीर लाल यांच्या माहितीनुसार, विशालने चौकशीत सुब्रतने त्याला वडिलांची हत्या करण्यास सांगितल्याचे आणि त्यासाठी सहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. पकडले गेल्यास शालूचे नाव घेण्यासही सुब्रतने सांगितल्याचा विशालचा दावा आहे. चौकशीदरम्यान सुब्रतने सुरुवातीला शालूवर आरोप कायम ठेवले. मात्र तपासाची दिशा आपल्या विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने जबाब बदलला. विशालने सुरुवातीच्या जबाबात सुब्रतचे नाव घेतले नसल्याचे समजल्यानंतर सुब्रत संभ्रमात पडला होता. शालू या प्रकरणात अडकत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने हत्येची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. चौकशीदरम्यान सुब्रत आणि शालू यांना समोरासमोर बसवण्यात आले. त्यावेळी शालू भावूक झाली, तर सुब्रतने फारसे बोलणे टाळल्याचे सूत्रांनी सांगितले. शालूने आपल्याला हत्येबाबत काहीही माहिती नसल्याचे आणि आपला या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगितले आहे.

पोलिस आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित कारणांचाही तपास करत आहेत. विशालच्या जबाबानुसार, विनीत आपली मालमत्ता इतर महिलांच्या नावावर करू शकतात, अशी भीती सुब्रतला होती. सुब्रतवर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचेही तपासात समोर आले आहे. यात वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्जे आणि मित्राकडून घेतलेल्या पैशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. विनीत आणि सुब्रत यांच्यातील वादाचाही तपास सुरू आहे. जूनमध्ये कार्यालयातील काही वस्तू वडिलांच्या परवानगीशिवाय विकून त्यातून मिळालेले पैसे स्वतःकडे ठेवल्याचे समोर आल्यानंतर विनीत यांनी सुब्रतला फटकारले होते. मात्र 2022 मध्ये केलेल्या नोंदणीकृत मृत्युपत्रानुसार विनीत यांची मालमत्ता पत्नी पुनिता, मुलगा सुब्रत आणि मुलगी शुभानी यांच्या नावावर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणात सुब्रत आणि विशाल यांच्यातील फोन कॉलही महत्त्वाचे ठरले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सुमारे 258 कॉल झाले होते, तर विशाल आणि शालू यांच्यात सुमारे 28 कॉल झाले होते. हत्येच्या दोन दिवस आधी, 3 सप्टेंबरला विशालने नवीन सिमकार्ड घेतले होते. या क्रमांकावरून केलेले पाच कॉल केवळ सुब्रतला करण्यात आले होते. पोलिसांनी सुब्रत, शालू आणि विशालशी संबंधित सात मोबाईल क्रमांकांचे 1 मे ते 6 सप्टेंबरपर्यंतचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले आहेत. सुब्रतच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे 22 जुलैपासून बंद असल्याचेही तपासात समोर आले असून ते जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते का, याचा तपास सुरू आहे. 

5 सप्टेंबरच्या रात्री विनीत यांची कानपूरमधील घरात चाकूने हत्या झाली. त्यावेळी सुब्रत आणि शालू पार्टीसाठी बाहेर गेले होते. त्यानंतर पोलिसांनी विशाल गौतम आणि त्याचा साथीदार राज किशोर यांना अटक केली. आता सुब्रतची कबुली, विशालचा नवा जबाब, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही आणि घटनाक्रम यांची सांगड घालण्याचे काम कानपूर पोलिसांकडून सुरू आहे.