बिहारमधील नवादा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी 52 वर्षीय मुख्याध्यापकावर विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत. आनंदपुरा येथील शाळेचे मुख्याध्यापक महेश प्रसाद यादव विद्यार्थिनींना उचलून घेत होते, त्यांच्या गालाला स्पर्श करत होते. शिवाय स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्यांच्यामागे जात असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. स्वच्छतागृहात गेल्यानंतर मुख्याध्यापक डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही विद्यार्थिनींनी सांगितले. या आरोपांनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला. त्यांनी शाळेत जमून मुख्याध्यापकांविरोधात आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे
विद्यार्थीनींचा विनयभंग करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला अटक
विद्यार्थीनींनी पोलीस आणि कुटुंबीयांना त्यांच्या आरोपांबाबत माहिती दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महेश प्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनींचा विनयभंग आणि अयोग्य हेतूने स्पर्श केल्याच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली असून, पॉक्सो कायद्यातील संबंधित तरतुदीही लावण्यात आल्या आहेत. 18 सप्टेंबर रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी शाळेत पोहोचले. पोलिसांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. नवादा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे मुख्याध्यापकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...
विद्यार्थिनी आरोप सांगत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ उमाशंकर सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनींच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विनयभंग आणि अयोग्य स्पर्शाचे आरोप आहेत. विद्यार्थिनींची महिला पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनी आरोप सांगत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही मुली रडत असल्याचे दिसत आहे. मुख्याध्यापकांच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवादा पोलीस अधीक्षकांनी सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना केली आहे.
दरम्यान, बिहारमधील जमुई येथे अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या छळाच्या घटनेनंतर काही दिवसांतच नवादामधील हे प्रकरण समोर आले आहे. जमुई शहरात इयत्ता दहावीतील एक मुलगा आणि मुलगी कोचिंग क्लासमधून परतत असताना काही पुरुषांच्या गटाने त्यांना अडवल्याचा आरोप आहे. दोघे स्कूटरवरून मदवा पहाड येथे गेले होते. शनिवारी संध्याकाळी परतताना या गटाने त्यांना थांबवून शिवीगाळ केली, स्कूटरवरून खाली उतरवले आणि मारहाण केली. दोघांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केल्यानंतर गटाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












