बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे
ketan agarwal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 5 हजार 53 पानी दोषारोपपत्रातून कटाबाबत महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. रितेश हांगेची भूमिका, चॅटजीपीटीवरील शोध आणि विषारी मशरूमसंदर्भातील तपासाची माहिती चार्जशीटमध्ये आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा
केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे
ketan agarwal murder case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात 5 हजार 53 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून या हत्येच्या कटाबाबत अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला संपवण्यासाठी कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात रितेश हांगे या चेतनच्या मित्राची भूमिकाही तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रितेशला या कटाची माहिती होती आणि त्याने काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मदत केली. सुरुवातीला केतनचा मृत्यू गडावरून पडल्याने झालेला अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर या घटनेमागे कट असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. केतनला लोहगडावर बोलावण्यासाठी ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आले होते. वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून त्याला तिथे बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : Personal Finance: मित्रांसोबत बाहेर गेल्यावर बजेटचा गेम ओव्हर! Treat देण्याची सवय महागात पडतेय?
चेतनचा मित्र रितेश हांगे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे दोषारोपपत्रात नमूद
या संपूर्ण कटात बीडचा रहिवासी आणि चेतनचा मित्र रितेश हांगे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी रितेशला माफीचा साक्षीदार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तो त्यासाठी तयार झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, रितेशने केवळ कटाची माहिती ठेवली नव्हती, तर कटाच्या काही भागात पुढाकारही घेतला. केतनचा मृत्यू अपघातासारखा दाखवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्याने आपल्या मित्रांशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले. एका मित्रामार्फत अपघात घडवून आणण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न पुढे झाला नाही. त्यानंतर सिया, चेतन आणि रितेश यांनी केतनला संपवण्यासाठी दुसरा मार्ग शोधल्याचा पोलिसांचा दावा आहे. चेतनला पोलिसांपासून वाचण्यासाठी कोणते पुरावे मागे ठेवू नयेत, मोबाईलचा वापर कसा करावा, याबाबतही रितेशकडून मार्गदर्शन झाल्याचे तपासात नमूद आहे. या प्रकरणात रितेशचा सहभाग असल्याचे दाखवणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
हेही वाचा : IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणाला नवं वळण! परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना CCTV मध्ये दिसला साहिल
