UP panchayat settles minor rape case fixes marriage with accused : : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या तक्रारीनंतर गावच्या पंचायतने कथितरित्या प्रकरण तडजोडीत मिटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. यामध्ये मुलीच्या कुटुंबीयांवर आणि अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांवर तडजोडीसाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिचा विवाह आरोपी मुलासोबत करण्याचा निर्णय पंचायतमध्ये घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या सुरुवातीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शेजाऱ्यावर संशय, शरीरावर जखमांच्या खुणा; 18 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ, काय घडलं?
आरोपीने जवळपास वर्षभर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी आरोपी मुलाने धमकी देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप केला होता. हे फोटो सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपीने जवळपास वर्षभर तिचे लैंगिक शोषण केल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलगी घाबरलेली असल्याने कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने कुटुंबीयांना कथित अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाऊन याबाबत विचारणा केली. तिथेही त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी शीशगढ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर आरोपी मुलासोबत विवाह करण्याचा निर्णय
पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर गावातील पंचायत बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही कुटुंबीयांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. सोमवारी मुलगा आणि मुलीचा साखरपुडा पार पडल्याची माहिती आहे. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिचा विवाह आरोपी मुलासोबत करण्याचा निर्णय पंचायतने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या कुटुंबातील एका सदस्याने दोघेही अल्पवयीन असल्याचे सांगत, दोघे विवाहासाठी पात्र झाल्यानंतर लग्न केले जाईल, असा दावा केला. गावकऱ्यांच्या उपस्थितीत साखरपुड्याशी संबंधित विधी झाल्याचेही या कुटुंबीयाने सांगितले. दोन्ही कुटुंबीयांनी प्रकरण तडजोडीत सोडवण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, बरेली पोलिसांनी शीशगढ परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. बरेलीचे पोलीस अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी या प्रकरणात पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही कुटुंबीयांनी तडजोड झाल्याचा दावा केला असला तरी पोलिसांची कारवाई सुरू आहे. आरोपीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गावातील ज्येष्ठांनी तीन दिवस चर्चा केल्यानंतर तडजोडीचा निर्णय घेण्यात आला. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर विवाह करण्याची इच्छा तिच्या कुटुंबीयांनीही व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात गावच्या पंचायतची भूमिका आणि दोन्ही कुटुंबीयांवर टाकण्यात आलेला कथित दबाव चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT












