UP Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समलैंगिक नात्यात अडथळा ठरत असलेल्या पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच आपल्या महिला प्रेयसीसोबत मिळून खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या हत्येसाठी 60 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत शेतकऱ्याची पत्नी, तिची महिला प्रेयसी आणि एका साथीदारास अटक केली असून दोन आरोपी सध्या फरार आहेत.
ADVERTISEMENT
दीड वर्षांपासून होते समलैंगिक प्रेमसंबंध
अधिकची माहिती अशी की, 14 जानेवारी रोजी असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीकर गावात शेतकरी सुमेर सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आरोपींनी सुमेर सिंह यांचा मृतदेह अरहराच्या शेतात फेकून दिला होता. शेतात मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. हे प्रकरण खुनाचे असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. फतेहपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कॉल डिटेल्स आणि स्थानिक चौकशीच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला. तपासात उघड झाले की मृतक सुमेर सिंह यांची पत्नी रेनू देवी आणि मालती देवी नावाच्या महिलेचे गेल्या दीड वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. हे नाते इतके घट्ट झाले होते की दोघींनाही एकत्र स्वतंत्र आयुष्य जगायचे होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, मालती देवीचे यापूर्वी तीन विवाह झाले होते. तरीही ती वारंवार सुमेर सिंह यांच्या घरी येत असे आणि बहुतांश वेळ रेनू देवीसोबतच घालवत होती. या संबंधांची माहिती सुमेर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मालती देवीला घरी येण्यास आणि रेनूशी संपर्क ठेवण्यास कडक मनाई केली. यानंतर दोघींनी छुप्या मार्गाने संपर्क सुरू ठेवला. मालती देवीने रेनूला एक लहान कीपॅड मोबाईल फोन दिला होता. या मोबाईलवरून दोघींमध्ये तासन्तास संभाषण होत असे. याच संभाषणांदरम्यान सुमेर सिंह यांना कायमचा संपवण्याचा कट रचण्यात आला.
हेही वाचा : पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात, 4 प्रवाशांचा मृत्यू; 22 जण जखमी
60 हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला
हा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी मालती देवीने तिच्या जुन्या ओळखीतील जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी याच्याशी संपर्क साधला. सुमेर सिंह यांच्या हत्येसाठी 60 हजार रुपयांची सुपारी ठरवण्यात आली. यापैकी 8 हजार रुपये रोख रक्कम रेनू देवीने मालतीमार्फत जितेंद्रला दिली, तर उर्वरित रक्कम हत्या झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. घटनेच्या दिवशी जितेंद्र गुप्ता आपल्या साथीदार राजू सोनकर आणि रामप्रकाश यांच्यासह आधीच दबा धरून बसला होता. सुमेर सिंह घटनास्थळी येताच आरोपींनी आधी दोरीने त्यांचा गळा आवळला आणि नंतर चाकूने गळा चिरून अत्यंत निर्दयपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह अरहराच्या शेतात फेकून सर्व आरोपी फरार झाले.
या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी मालती देवी, मृतकाची पत्नी रेनू देवी आणि राजू सोनकर यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी आणि रामप्रकाश हे दोघे सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून तीन मोबाईल फोन आणि हत्या करण्यासाठी वापरलेली दोरी जप्त करण्यात आली आहे. प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक अनूप सिंह यांनी सांगितले की, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











