Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावली कला गावात शनिवारी (16 मे) पहाटे हरपाल या 80 वर्षीय वृद्धाने आपल्या 72 वर्षीय पत्नी उर्मिला यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. हा थरारक गुन्हा केल्यानंतर आरोपी पती अजिबात घाबरला नाही, उलट हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड हवेत फिरवत तो स्वतः रावली पोलीस चौकीत हजर झाला. वृद्धाने जेव्हा पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करत 'मी माझ्या पत्नीची कुऱ्हाडीने तोडून हत्या केली आहे' असे सांगितले, तेव्हा तिथे उपस्थित पोलिसांचेही डोके चक्रावले आणि संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
डोक्याचा झाला चेंदामेंदा
ही घटना पहाटे 4 च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते, तेव्हा हरपालने झोपलेल्या पत्नी उर्मिला यांच्यावर कुऱ्हाडीने एकामागून एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने उर्मिला यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने अनेक गंभीर वार केले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन जेव्हा वृद्ध पोलीस चौकीत पोहोचला, तेव्हा पोलीस तात्काळ घटनास्थळाकडे धावले. घराच्या आतील दृश्य अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारे होते. खाट पूर्णपणे रक्ताने माखलेली होती आणि उर्मिला तिथे रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होत्या. पोलिसांनी घाईघाईने त्यांना मुरादनगर येथील सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा: 14 वर्षीय मुलगी अहिल्यानगरहून मामाकडे निघाली, पण कल्याण रेल्वे स्थानकात बलात्कार
लग्नात फोन आला अन्..
तपासादरम्यान समोर आले आहे की, आरोपी वृद्ध हरपाल हा रावली कला गावात आपल्या मुलीच्या घरी राहत होता. मृत महिलेच्या मुलीने रडत रडत सांगितले की, ते लोक एका लग्न समारंभासाठी मेरठला गेले होते. सकाळी जेव्हा त्यांना फोनवरून या भयानक घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या सांगण्यानुसार, आई-वडिलांमध्ये वारंवार किरकोळ वाद आणि भांडणे होत असायची, पण वडील आईचा खून करतील, असा स्वप्नातही विचार केला नव्हता.
हे ही वाचा : सख्ख्या बहिणींवर चार वर्षांपासून सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ऐकून घेतली नाही तक्रार, अखेर...
नातवाने दिला जबाब
मृत महिलेचा नातू कुणाल याने सांगितले की, रात्रीच्या वेळी तो आणि त्याचा भाऊ खोलीच्या आत झोपले होते, तर आजी-आजोबा बाहेर व्हरांड्यात झोपले होते. कुणालच्या मते, त्याचे आजोबा हरपाल यांची मानसिक स्थिती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती आणि रात्रीच्या वेळीही दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. याच मानसिक आजारपणामुळे आणि वादातून वृद्धाने आपल्या 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या जोडीदाराची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. हसनपूर आणि मुरादनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आरोपी पतीला ताब्यात घेऊन या हत्येचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या वेदनादायी आणि भयानक हत्याकांडानंतर संपूर्ण रावली कला गावात शुकशुकाट पसरला असून लोक प्रचंड दहशतीच्या छायेत आहेत.
ADVERTISEMENT











