Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील राया परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही मूळची राया परिसरातील असून तिचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पीडिता आपल्या आईसोबत आजोबांच्या देखभालीसाठी गावी आली होती. यादरम्यान तिची ओळख गावातील गोलू नावाच्या तरुणाशी झाली. डिसेंबर महिन्यात घरात कोणीही नसताना संशयित आरोपीने या 13 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
14 आठवड्यांची गरोदर
काही दिवसांनंतर पीडित मुलगी पुन्हा गोव्याला निघून गेली. मात्र, 29 मार्च रोजी अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने डॉक्टरांकडे नेले असता, वैद्यकीय तपासणीत ती 14 आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या अनपेक्षित माहितीमुळे मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने गावातील तरुणाने केलेल्या अत्याचाराची सर्व माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली.
डॉक्टरांचा गर्भपातास नकार
घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी कायदेशीर बाबींमुळे गर्भपातास नकार दिला आणि गोवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. गोव्यातील मडगाव टाऊन पोलिसांनी उपनिरीक्षक अनुष्का यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर ही घटना उत्तर प्रदेशातील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी राया पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपीचा शोध सुरु
सध्या या प्रकरणाचा तपास राया पोलिसांनी हाती घेतला असून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. महावनच्या पोलीस क्षेत्राधिकारी श्वेता वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी आणि प्रकरणातील पुढील पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गोव्याला रवाना केले जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











