UP Crime News : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील उसरैना गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय विवाहितेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळला. शनिवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सुरुवातीला ही हत्या की आत्महत्या, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मृत महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा गंभीर आरोप केला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हे संपूर्ण प्रकरण आत्महत्येचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि पीडितेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा आधार घेतला असून, आता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पती आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
भावाला व्हॉट्सॲप मेसेज आणि सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे तांत्रिक पुरावे मिळाले असून मृत विवाहितेने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी काही तास आधी आपला भाऊ आदित्य याला व्हॉट्सॲपवर काही मेसेज पाठवले होते. या संदेशामध्ये तिने आपल्या पतीसोबत झालेल्या वादाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि "माझ्या मुलीची काळजी घे" असे लिहिलेला एक हृदयद्रावक मेसेज पाठवला होता. तिने आपल्या मोबाईलचा पासवर्डही भावाला कळवला होता, जे पाहून भावाने तिला तात्काळ फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. पोलिसांनी सासरच्या घराची झडती घेतली असता, एका कुलूपबंद पेटीमध्ये पीडितेचा मोबाईल आणि एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर उल्लेख केला होता. शवविच्छेदन अहवालात या महिलेचा मृत्यू स्वतःवर गोळी झाडून घेतल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणातील सर्व संभ्रम दूर झाले आहेत.
पतीचे अनैतिक संबंध आणि सासूने शस्त्र लपवल्याचा प्रकार
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले आहे की, मृत महिलेचे तिच्या पतीशी, अमनशी सतत वाद होत असत. त्यांच्या लग्नाला अवघे एक वर्ष झाले होते, मात्र अमनच्या अनैतिक संबंधांमुळे ती प्रचंड मानसिक त्रासात होती. याच त्रासाला कंटाळून तिने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या विवाहितेने स्वतःवर गोळी झाडली, तेव्हा तिच्या सासूने घटनास्थळावरून गावठी पिस्तूल उचलून लपवून ठेवले होते. पोलिसांनी सासूला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता, तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ते गावठी पिस्तुल जप्त केलं आहे. सासरच्या मंडळींनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सुरुवातीला हे हत्येचे प्रकरण असल्याचे वाटत होते, परंतु सुसाईड नोट आणि व्हॉट्सॲप मेसेजमुळे सत्य समोर आले.
कौशांबी पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पती अमन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. पीडित महिलेच्या डोक्यावर असलेल्या जखमेच्या खुणांमुळे ही हत्या असल्याचे संशय व्यक्त केला जात होता, मात्र तांत्रिक पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाने सर्व काही स्पष्ट केले आहे. एका तरुण विवाहितेने लग्नानंतर अवघ्या एका वर्षात अशा प्रकारे स्वतःची जीवनयात्रा संपवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करत असून, पतीच्या अवैध संबंधांमुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











