Maharashtra FDA Show Cause Notice to Bollywood Actors : अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘विमल’ ब्रँडच्या ‘VIMAL Elaichi’ जाहिरातीमध्ये सहभागी झाल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’चा अप्रत्यक्षपणे प्रचार होतोय का, याबाबत प्रशासनाने तिन्ही अभिनेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. संबंधित जाहिरात टीव्ही, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर प्रसारित होत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आईला 'तो' मेसेज आला, घरमालकाने दार उघडताच भयंकर दृश्य दिसलं, इंजिनिअर दाम्पत्यासोबत काय घडलं?
अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ‘VIMAL Elaichi’ या नावाने जाहिरात करण्यात आली असली तरी ‘VIMAL’ हा ब्रँड पान मसाल्याशी मोठ्या प्रमाणावर जोडला जातो. त्यामुळे या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात ‘विमल पान मसाला’ची आठवण किंवा ओळख कायम राहण्याची शक्यता आहे का? याची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित पान मसाला उत्पादनाच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी असल्याचे प्रशासनाने नोटीसमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा : शाळेतील मुलींनी मांडल्या व्यथा, थेट झाडाझडती; दीपके कुणावर संतापले?
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 अंतर्गत निर्बंध आहेत. अशा जाहिरातीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीवरही कारवाईची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरातींबाबतच्या नियमांचाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. जाहिरातीत सहभागी होण्यापूर्वी तिन्ही अभिनेत्यांनी आणि त्यांच्या संबंधित एजन्सींनी कोणती तपासणी केली होती? याची माहितीही मागवण्यात आली आहे. ‘VIMAL Elaichi’ हे स्वतंत्र उत्पादन आहे की प्रतिबंधित पान मसाला उत्पादनाच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने तिन्ही अभिनेत्यांना संबंधित जाहिरातीतील सहभाग आणि प्रमोशन तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स, वेबसाइट आणि त्यांच्या नियंत्रणातील इतर डिजिटल माध्यमांवरून संबंधित जाहिरात किंवा प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जाहिरातीशी संबंधित करार, मोहिमेची माहिती, जाहिरात कोणत्या माध्यमांवर प्रसारित झाली आणि त्याबाबतची इतर कागदपत्रे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आहेत. या मुदतीत स्पष्टीकरण न दिल्यास किंवा दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ADVERTISEMENT












