शाळेतील मुलींनी मांडल्या व्यथा, थेट झाडाझडती; दीपके कुणावर संतापले?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आजपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दीपकेंचं मूळगाव हिंगोलीत असल्याने त्यांनी तिथे जाऊन शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेतील मुलींनी तेथील समस्या दीपकेंसमोर मांडल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेतील मुलींनी मांडल्या व्यथा, थेट झाडाझडती
दीपके कुणावर संतापले?
Abhijit Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दीपकेंनी त्यांच्या मूळगावापासूनच शाळांच्या दुरवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक शाळेला भेट देऊन शाळेच्या आतील सर्व बाबींची, वर्गांची आणि परिसराची सखोल तपासणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि शालेय समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
एक दिवस आधी स्वच्छतागृहाची सफाई
या संवादादरम्यान विद्यार्थिनींनी शाळेतील अनेक गंभीर समस्या दीपकेंसमोर मांडल्या. गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असल्याची तक्रार मुलींनी केली. सर्वात विदारक परिस्थिती स्वच्छतागृहांची असून, ती नेहमी अत्यंत घाणेरडी आणि मोडकळीस आलेली असतात, ज्यामुळे मुलींना नाइलाजाने स्वच्छतागृहासाठी थेट घरी जावे लागते. शाळेत वापरण्यासाठी पुरेसे पाणीही उपलब्ध नाही. दीपके यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केवळ एक दिवस आधीच स्वच्छतागृह साफ करण्यात आल्याची धक्कादायक बाबही या संवादातून उघड झाली.
हे ही वाचा : शिंदेंचा उल्लेख करत दीपके चिडले, फडणवीस सरकारला घेरण्याचे संकेत?
शैक्षणिक सुविधांचा वानवा
पायाभूत सुविधांच्या अभावाबरोबरच इतर शैक्षणिक सुविधांचीही शाळेत मोठी वानवा असल्याचे निदर्शनास आले. शाळेत संगणक कक्ष किंवा चालू अवस्थेतील संगणक उपलब्ध नाहीत, तसेच सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही अज्ञातांकडून फोडण्यात आले आहेत. बहुतांश वर्गांमध्ये बेंचेसची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आजही जमिनीवरच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे; अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही जमिनीवरच बसावे लागते. असे असले तरी, शाळेत मिळणारे जेवण (पोषण आहार) चांगले असून शिक्षक व्यवस्थित शिकवत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
हे ही वाचा : जरांगे पाटलांवर प्रश्न येताच पंकजा मुंडेंचं सॉफ्ट उत्तर, नेमकं काय म्हणाल्या?
पालकांनीही पुढे यावे
या संपूर्ण पाहणीनंतर अभिजीत दीपके यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थिनींनी मांडलेल्या सर्व तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणीतील त्रुटींची नोंद घेऊन ते या दुरवस्थेवर एक सविस्तर अहवाल तयार करत आहेत. या गंभीर विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शाळेचा विकास साधण्यासाठी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पुढे येऊन या समस्यांवर मोकळेपणाने प्रशासनाला जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.
