शिंदेंचा उल्लेख करत दीपके चिडले, फडणवीस सरकारला घेरण्याचे संकेत?

मुंबई तक

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके हिंगोलीतील त्यांच्या मूळगावी पोहचले. यावेळी दीपकेंनी तेथील प्राथमिक शाळांची पाहणी करत त्यातील समस्यांवर आवाज उठवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत अभिजीत दीपकेंनी सरकारला घेरलं. याशिवाय देशातील विविध मुद्द्यांवर अभिजीत दीपकेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

Abhijit Dipke
Abhijit Dipke
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिंदेंचा उल्लेख करत दीपके चिडले

point

फडणवीस सरकारला घेरण्याचे संकेत?

Abhijit Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील मूळगावी जाऊन प्राथमिक शाळेची पाहणी केली आणि शैक्षणिक गैरसोयींवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. तरुणाईच्या स्वातंत्र्याची आणि भविष्याची व्याख्या स्पष्ट करताना दीपके म्हणाले की, जोपर्यंत सर्वांना संधीची समानता मिळत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकत नाही. केवळ कागदावर स्वातंत्र्य असून चालणार नाही, तर तळागाळातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी मिळायला हव्यात, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही...

राज्यातील शिक्षण आणि आरोग्याच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना त्यांनी गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेल्या मुलींच्या मृत्यूचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. आजही अनेक लहान मुले-मुली चिखलातून, साचलेल्या पाण्यातून आणि शेतातून जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत, ही स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जर सरकारने चांगले रस्ते आणि बस सुविधा उपलब्ध करून दिली असती, तर विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे नमूद केले. यासोबतच, सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते आणि एका सीटी स्कॅनसारख्या तपासणीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागते, याकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारच्या 'मानव विकास निर्देशांक' वाढल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

हे ही वाचा : शेतातील झोपडीत सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, थोरल्या बहिणीने नको तेच पाहिलं अन्..

गरिबांच्या मुलांनी शिकायचं कसं?

हिंगोलीतील ज्या शाळेची त्यांनी पाहणी केली, तिथली विदारक परिस्थिती त्यांनी सर्वांसमोर मांडली. शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत खूपच कमी बाक आहेत आणि बहुतांश मुलांना खाली जमिनीवर बसावे लागते. शाळेच्या फुटलेल्या खिडक्या झाकण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत, हा विरोधाभास त्यांनी निदर्शनास आणून दिला. एकीकडे सरकारी शाळांची दुरवस्था असताना दुसरीकडे खाजगी शाळांमध्ये पहिली-दुसरीसाठी एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारले जात आहे. या अवाढव्य फीवर शासनाचे नियंत्रण असायला हवे अशी मागणी करत, खाजगी शाळांच्या लूटमारीमुळे गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडले अन्..

शाळांच्या स्थितीवर अहवाल तयार करणार

महात्मा गांधींच्या 'खेड्याकडे चला' या विचाराचा संदर्भ देत दीपके यांनी स्पष्ट केले की, आपला देश खेड्यांमध्ये वसतो आणि जोपर्यंत गावांचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे. आगामी काळात देशाचे राजकारण केवळ शहरातील लोक नाही, तर ग्रामीण भागातील तरुण ठरवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील सरकारी शाळा सर्वात आधी दर्जेदार झाल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. यापुढील काळात आपण जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही फिरून विविध शाळांची पाहणी करणार असून, या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षणाच्या वास्तवावर एक सविस्तर अहवाल तयार करणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी यावेळी केली.