लिंगबदल शस्त्रक्रियेला आईचा विरोध, 17 वर्षीय मुलाकडून क्रूरपणे हत्या
UP Crime News : लखनौमध्ये लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्याच्या इच्छेवरून आई आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या वादातून मुलाने लोखंडी पान्याने आईची हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लिंगबदल शस्त्रक्रियेला आईचा विरोध
17 वर्षीय मुलाकडून क्रूरपणे हत्या
UP Crime News : लखनौमध्ये लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्याच्या इच्छेवरून झालेल्या वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या 42 वर्षीय आईची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना गुरुवारी राजेंद्र नगर परिसरातील व्हिजन अपार्टमेंटमध्ये घडली. नाका हिंडोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा मुलगी म्हणून राहत होता आणि त्याला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घ्यायची होती. या मुद्द्यावरून कुटुंबात आधीपासूनच वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आई अल्पवयीन मुलाला ही शस्त्रक्रिया न करण्याबाबत समजावत होती. त्याऐवजी वैद्यकीय आणि मानसिक उपचार घेण्याचा सल्ला ती देत होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर अल्पवयीन मुलाने लोखंडी पाईपने आईच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर अल्पवयीन मुलाने स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर
अल्पवयीन मुलगा घटनास्थळीच उपस्थित
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना अपार्टमेंटमध्ये महिलेचा मृतदेह आढळला, तर अल्पवयीन मुलगा घटनास्थळीच उपस्थित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी संशयित हत्यारासह इतर पुरावे गोळा करण्यात आले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
नाका हिंडोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक कुमार चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अल्पवयीन मुलाला लिंगविषयक अस्वस्थता जाणवत असण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान तज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडून त्याचे समुपदेशन केले जाणार आहे. या घटनेत नेमका काय क्रम घडला आणि हल्ल्याची परिस्थिती काय होती, हे न्यायवैद्यक तपास आणि पुढील चौकशीतून स्पष्ट केले जाणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
