Shruti Marathe Vs Vidyadhar Joshi : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार ढोल-ताशा पथकांमध्ये सामील होऊन उत्साहाने वादन करताना दिसतात. मात्र, या वादनाबाबत ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत काही थेट प्रश्न उपस्थित केले होते. कलाकारांच्या या वादनाबाबत साशंकता व्यक्त करताना, विसर्जन मिरवणुकीत हे कलाकार नेमका किती वेळ वादन करतात आणि रिल्समध्ये दिसणाऱ्या जोशात ते सतत वाजवतात का, असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून केला होता. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर आणि अभिनय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.
ADVERTISEMENT
'प्रत्यक्ष येऊन पहावे'
विद्याधर जोशी यांच्या या प्रश्नांवर अभिनेत्री श्रुती मराठे हिने सडेतोड उत्तर दिले. श्रुती मराठेने कमेंट करत लिहिले की, जवळपास दीड महिन्यांची मेहनत आणि सराव करून हे सर्व कलाकार 11 दिवसांत 14 वेळा वादन करतात. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग साडेसात तास मिरवणुकीत वादन केले जाते, कारण ही केवळ औपचारिकता नसून कलाकारांचे यावर मनापासून प्रेम आहे. घरी बसून फेसबुकवर प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन पाहावे, म्हणजे सर्व शंकांचे निरसन होईल, असा टोलाही तिने लगावला.
हे ही वाचा : कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?
ऐकणाऱ्यालाच जास्त त्रास
श्रुती मराठेच्या या रोखठोक प्रतिक्रियेनंतर अभिनेते विद्याधर जोशी यांनी लगेचच दुसरी कमेंट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काही ओळींतच आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्याचे सांगत त्यांनी श्रुतीचे आभार मानले आणि तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. तसेच, प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा स्वतः वादन करायला आवडेल, असा उल्लेख करत त्यांनी उपरोधिकपणे जोडले की, वाजवणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला त्याचा त्रास जास्त होतो, हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे.
हे ही वाचा : Personal Finance: मुलांच्या नावावर Investment करताना पालक करतात ‘या’ चुका!
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
शेवटी विद्याधर जोशी यांनी आपल्या वक्तव्यामुळे श्रुतीला किंवा इतर कलाकारांना राग आला असल्यास ते स्वाभाविक असल्याचे मान्य केले. फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नाला श्रुतीने थेट उत्तर दिल्याबद्दल त्यांनी तिचे शतशः आभार मानले. अशा प्रकारे वरिष्ठ अभिनेत्याचा उपरोधिक प्रश्न आणि त्याला तरुण अभिनेत्रीने दिलेले सडेतोड उत्तर यामुळे गणेशोत्सवातील कलाकारांच्या ढोल-ताशा वादनाचा विषय सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. नेटकऱ्यांनीही यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
ADVERTISEMENT












