भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार. सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी स्वातंत्रवीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप सिंह या सिनेमातून करणार आहेत.संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” असं संदीप सिंह म्हणाले आहेत.‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ऋषि विरमानी आणि महेश मांजरेकर यांनी सिनेमाची कथा लिहली आहे. तर अद्याप सिनेमातील कलाकारांची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही.
