आठ महिन्यांच्या बाळाला एक मोलकरीण दीड तास बेदम मारहाण करत होती. यामुळे या मुलाचं ब्रेन हॅमरेज झालं आहे. गुजरातमधल्या सूरत शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे. ही मोलकरीण आठ महिन्यांच्या बाळाला मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. गुजरातमधल्या सूरत या शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
सूरतमध्ये एका घरात काम करणारी मोलकरीण आठ महिन्यांच्या मुलाला मारहाण करत होती. दीड तास तिने या बाळाला मारहाण केली. तिने केलेली मारहाण इतकी भयंकर होती की मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईने त्या आठ महिन्यांच्या बाळाला प्रचंड मारहाण केली. पोलिसांनी या महिलेला बाळाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली ताब्यात घेतलं आहे. बाळाचं ब्रेन हॅमरेज झालं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असं रांदेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. एल. चौधरी यांनी सांगितलं.
चौधरी या प्रकरणी माहिती देताना म्हणाले की सूरत शहरात ही मोलकरीण जिथे काम करते त्या दाम्पत्याला दोन जुळी मुलं आहेत. या मुलांचे आई वडील दोघंही कामावर जातात. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी या महिलेला कामावर ठेवलं होतं. जी. विभागाचे एस.पी. झेड. आर. देसाई यांनी सांगितलं की, आम्हाला जेव्हा बाळाला मारहाण केल्याची बाब समजली तेव्हा आम्ही तातडीने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्यात आम्ही हे पाहिलं की या बाईने बाळाला मांडीवर घेतलं आहे आणि त्याला मारहाण करते आहे. तिने त्याला बेडवरही आपटलं. दीड तास ही महिला बाळाला मारहाण करत होती. त्यामुळे आम्ही त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे.
देसाई यांनी हे देखील सांगितलं की ज्या महिलेला आम्ही अटक केली आहे ती महिला या घरात सप्टेंबर 2021 पासून काम करते आहे. बाळाचे वडील मितेश पटेल म्हणाले की आम्ही दोन दिवसांपूर्वीच घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कारण आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा तुमच्या मुलांचा रडण्याचा आवाज जास्त येतो. देसाई हे देखील म्हणाले की आम्ही हे पाहिलं की ही महिला काहीतरी तणावात आहे. कसला तरी राग तिने या बाळावर काढला. सध्या या महिलेवर बाळाच्या हत्येचा प्रयत्न आणि बाळाला जखमी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. तिचा कोव्हिड रिपोर्ट समोर आल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण होईल.
ADVERTISEMENT
