डेटिंग अॅप, हॉटेलची रुम… १६ तरुणांना लुटणारी महिला

मुंबई तक

• 02:38 PM • 05 Feb 2021

पिंपरी-चिंचवड: डेटिंग अपच्या माध्यमातून तब्बल १६ तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह १० लाखांहून अधिकच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना माहिती दिली. महिला तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायची तरी कशी? कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बम्बल […]

Mumbaitak
follow google news

पिंपरी-चिंचवड: डेटिंग अपच्या माध्यमातून तब्बल १६ तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह १० लाखांहून अधिकच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना माहिती दिली.

हे वाचलं का?

महिला तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायची तरी कशी?

कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बम्बल डेटिंग अॅपच्या माध्यमातून महिला काही तरुणांना हेरून त्यांच्याशी मैत्री करायची. काहीशी ओळख वाढल्यानंतर महिला तरुणाला आपण एखादी रात्र एकत्र घालवूयात असं म्हणत एखाद्या हॉटेलवर भेटण्यासाठी बोलवायची. महिलेच्या या आमिषाला तरुण सहज फसायचे आणि तिला भेटण्यासाठी हॉटेलवर जायचे. यावेळी महिला सुरुवातीलाच तरुणाला दारु पाजण्याच्या बहाण्याने त्याला गुंगीचं औषध द्यायची. ज्यावेळी तरुण बेशुद्ध व्हायचा त्यावेळी महिला त्याच्याजवळील सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन तिथून पसार व्हायची. यावेळी तरुणाकडे कोणताही पुरावा राहू नये यासाठी ती आपल्या मोबाइलमधून डेटिंग अॅप डिलीट करायची. त्यानंतर ती आपला फोन नष्ट करायची किंवा कुठेतरी फेकून द्यायची.

खरं तर ही महिला चांगली शिकली-सवरलेली आहे. तिने सुरुवातीला काही बड्या कंपन्यांमध्ये काम देखील केलं होतं. पण तिच्या विचित्र सवयींमुळे तिला अनेक ठिकाणांहून काढून टाकण्यात आलं होतं. घरी आजारी आई असल्याने तिच्या औषध खरेदीच्या निमित्ताने ही महिला गुंगीची औषध मिळवायची आणि याचाच वापर ती तरुणांना बेशुद्ध करण्यासाठी करायची.

दरम्यान, फक्त डेटिंग अॅपचं नाव आणि एका महिलेने फसविल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे या महिलेचा शोध घेणं पोलिसांसाठी फारच अवघड काम होतं. यावेळी पोलिसांनी डेटिंग अॅपवरुन महिलेबाबत बरीच माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला तिच्याविषयी काहीही माहिती मिळाली नाही.

यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्याच पद्धतीने आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आपल्याच एका पोलीस अधिकाऱ्याला डेटिंग अॅपवरुन महिलेशी मैत्री करण्यास सांगितलं. सुरुवातीला महिला या अधिकाऱ्याला भेटण्यास अजिबात तयार नव्हती.

तेव्हा तपास अधिकाऱ्यांना एक गोष्ट समजली की, या महिलेने आपल्या चार वेगवेगळ्या अकाउंटपैकी एका अकाउंटवर समलैंगिक होण्याविषयी तिने उल्लेख केला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी एका मुलीचं अकाउंट बनवलं आणि या अकाउंटवरुन त्यांनी महिलेशी मैत्री केली. महिलेने देखील यावेळी बातचीत सुरु केली आणि आपला मोबाइल नंबर शेअर केला. जेव्हा पोलिसांना महिलेचा मोबाइल नंबर मिळाला. त्यानंतर तात्काळ एक टीम महिलेच्या घरी पोहचली आणि त्यांनी तिच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, महिलेला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. ज्यामध्ये तिने कबूल केलं आहे की, आतापर्यंत 16 तरुणांना आणि तीन तरुणींना जाळ्यात अडकवून लाखो रुपयांना लुटलं आहे.

    follow whatsapp