नवी दिल्ली: भारत-पाकमधील तणाव कायम असतानाच भारतीय लष्कराने आज (12 मे) पुन्हा पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती देखील दिली. 'आम्ही पाकिस्तानमधील किराणा हिल्सच्या अण्वस्त्र असलेल्या ठिकाणांवर हल्ला केलेला नाही.' सॅटेलाईट इमेजरीमध्ये सरगोधा येथील मुशफ एअरबेसच्या धावपट्टीवर हल्ला झाल्याचे दिसून आले. ज्याचा संबंध किराणा टेकड्यांच्या खाली असलेल्या भूमिगत अण्वस्त्र ठिकाणांशी असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर, असा अंदाज लावला जात होता की, या तळावर भेदक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
किराणा हिल्सवर हल्ला झाला नाही
जेव्हा एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आले की, भारताने किराणा हिल्सवर हल्ला केला होता का?, तेव्हा ते म्हणाले, 'किराणा हिल्समध्ये काही अण्वस्त्र आहेत हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती. आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाही, तिथे काहीही असो, किंवा कालच्या ब्रीफिंगमध्ये आमच्याकडून असे काहीही नमूद करण्यात आले नव्हते.' असं ते म्हणाले.
हे ही वाचा>> Operation Sindoor मधून भारतानं नेमकं काय साध्य केलं? जाणून घ्या महत्वाचे 12 मुद्दे
भारतीय सशस्त्र दलांनी किराणा हिल्समधील पाकिस्तानच्या अण्वस्त्राला लक्ष्य केलेले नाही, अशी पुष्टी हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएओ) एअर मार्शल ए. के. भारती यांनी केली आहे. प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानच्या 11 हवाई तळांना लक्ष्य करून नष्ट केले आहे, ज्यात सरगोधा आणि नूर खान सारख्या महत्त्वाच्या लष्करी तळांचा समावेश आहे.
ए. के. भारती यांनी यावेळी सांगितले की, 'आमचे सर्व लष्करी तळ, यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि भविष्यात गरज पडल्यास त्यांच्या पुढील मोहिमेसाठी सज्ज आहेत. आम्ही दाखवलेल्या फोटोंवरून स्पष्टपणे दिसून येते की ते तुर्की ड्रोन असोत किंवा इतर कुठूनही आलेले ड्रोन असोत, आमची काउंटर-ट्रॉन सिस्टीम पूर्णपणे सक्षम आहे. तसेच, ड्रोनचा सामना करण्यासाठी आमच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने हे दाखवून दिले आहे की आम्ही कोणत्याही तंत्रज्ञानाचा सामना करू शकतो.'
हे ही वाचा>> "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती
लष्कराने काल दाखवलेले हल्ल्याचे फोटो
रविवारी (11 मे) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, लष्कराने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार, हवाई तळ आणि इतर लष्करी तळांना झालेल्या नुकसानाचे फोटो दाखवले होते. एअर मार्शल भारती यांनी पुष्टी केली होती की, ऑपरेशन दरम्यान पसरूर, चुनियान आणि आरिफवाला येथील हवाई संरक्षण रडार नष्ट करण्यात आले होते.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने (IAF) 11 पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर सॅटेलाइट इमेजवरून पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची पुष्टी करण्यात आली. यामध्ये रफीकी, मुरीदके, चकलाला, रहीम यार खान, सकर, चुनियान, पसरूर आणि सियालकोट येथील रडार केंद्रे, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि दारूगोळा डेपो यांचा समावेश होता.
ADVERTISEMENT
