राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या आठवड्यापासून नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून ते कार्यक्रमांमध्ये उपस्थित दिसत नसल्याने अशा चर्चा होत होत्या. मात्र मावळमध्ये आल्यानंतर अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि त्यांच्या बाबत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. आपण महाराष्ट्रात नव्हतो तर परदेशात होतो असंही अजित पवारांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
अजित पवारांविषयी काय चर्चा रंगली होती?
शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर काही दिवसांपूर्वी पार पडलं. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कँडी रूग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन उपस्थित राहिले. मात्र अजित पवार हे नेमके त्यादिवशी अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार नाराज झाले आहेत अशा चर्चांना उधाण आलं. एवढंच नाही अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरले त्याबाबतही अजित पवार यांची प्रतिक्रिया आली नाही. त्यांनी फक्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली. यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं. मात्र आज या सगळ्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले आहेत अजित पवार?
मला खोकला सुरू झाला होता. त्यामुळे काही कार्यक्रमांमध्ये नव्हतो. तसंच त्यानंतर मी परदेशात गेलो होतो. तिकडे जाण्याचं माझं सहा महिने आधीपासून ठरलेलं होतं. आता माझी प्रकृती बरी आहे. मात्र काहीही बातम्या माझ्याबाबत सुरू झाल्या होत्या. असल्या चर्चांना काही अर्थ नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मला काही खासगी आयुष्य आहे की नाही?
आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खासगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची. असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजी मागचं गूढ अखेर स्वतःच समोर आणलं.
ADVERTISEMENT
