अंबानी स्फोटकं-मनसुख हिरेन प्रकरण : 10 आरोपींविरुद्ध NIA ने दाखल केलं आरोपपत्र

दिव्येश सिंह

• 01:33 PM • 03 Sep 2021

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. १० आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र सादर करण्यात आलं असून, ते नऊ ते हजार पानांचं आहे. अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) […]

Mumbaitak
follow google news

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. १० आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र सादर करण्यात आलं असून, ते नऊ ते हजार पानांचं आहे.

हे वाचलं का?

अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) देण्यात आला होता. याप्रकरणी एनआयएकडून तपास सुरू असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या प्रकरणातील दहा आरोपींविरुद्ध शुक्रवारी आरोपपत्र दाखल केलं.

हे आरोपपत्र ९ ते १० हजार पानांचं असून, यात मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, निलंबित एपीआय रियाझुद्दीन काझी, निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी व सतीश तिरूपती मुतकारी यांच्या नावांचा समावेश आहे.

कोणत्या कलमाखाली गुन्हे?

या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध भादंवि १२०(ब), २०१, २८६, ३०२, ३६४, ३८४, ३८६, ४०३, ४१९, ४६५ तसेच भादंवि ४७१, ४७३ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ नुसार व स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ४, १६, १८ व २० UP(p) अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत.

आतापर्यंतच्या तपासात काय आढळलं?

एनआयएने केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत. यात एसयूव्ही कार मनसुख हिरेन याच्या ताब्यात होती. मनसुख हिरेन सचिन वाझेला ओळखत होता आणि सचिन वाझेही पूर्वी कार चालवायचा. स्कॉर्पिओ कार अंबानींच्या घराजवळ सापडण्याच्या एका आठवड्यापूर्वी मनसुख हिरेन याने ती चोरीला गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान, स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्रातील रेतीबंदर परिसरात सापडला होता. हिरेनला तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांने भेटायला बोलावलं होतं, असं त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह सापडल्यानंतर सांगितलं होतं. मनसुख हिरेनचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी आढळला होता.

सचिन वाझेने केली मनसुख हिरेनची हत्या

सचिन वाझे याने सुनील माने, विनायक शिंदे आणि अन्य आरोपींच्या मदतीने मनसुख हिरेनची हत्या केल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं. एनआयएने विविध अंगाने या प्रकरणाचा तपास केला. त्यात आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. २५-२५ फेब्रुवारीला स्कॉर्पिओ गाडीत वाझेने जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या होत्या, हेही एनआयएच्या तपासातून समोर आलं.

एनआयएने तब्बल २०० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. २० साक्षीदार संरक्षित असून, त्यांचे जबाब बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत. या साक्षीदारांचे जबाब गुन्हेगारी प्रक्रियेच्या नियमानुसार न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरूच आहे, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

    follow whatsapp