महाराष्ट्राच्या सुपूत्राला काश्मिरात वीरमरण; दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण शहीद

मुंबई तक

• 02:13 PM • 19 Feb 2022

–स्वाती चिखलीकर, सांगली काश्मीर खोऱ्यात आज उडालेल्या धुमश्चक्रीत महाराष्ट्राच्या सुपूत्रासह दोन जवानांना वीरमरण आलं. शोपियातील झेनपोरा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची शोध मोहीम सुरू असताना चकमक उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील रोमित तानाजी चव्हाण (वय २३) हा जवान शहीद झाला. तर संतोष यादव असं शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचं नाव आहे. दक्षिण काश्मिर […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, सांगली

हे वाचलं का?

काश्मीर खोऱ्यात आज उडालेल्या धुमश्चक्रीत महाराष्ट्राच्या सुपूत्रासह दोन जवानांना वीरमरण आलं. शोपियातील झेनपोरा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची शोध मोहीम सुरू असताना चकमक उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील रोमित तानाजी चव्हाण (वय २३) हा जवान शहीद झाला. तर संतोष यादव असं शहीद झालेल्या दुसऱ्या जवानाचं नाव आहे.

दक्षिण काश्मिर भागात असलेल्या झेनपोरामधाली चेरमर्ग गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी जम्म काश्मीर पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली होती.

सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करण्याआधीच दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळाबाराला संयुक्त पथकाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असतानाच रोमित चव्हाण हा जवान दहशतवाद्यांच्या गोळीबारात धारातिर्थी पडले.

शहीद रोमित चव्हाण शिगाव येथील असून, १ राष्ट्रीय रायफल्स दलात कार्यरत होता. पाच वर्षांपूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्याचं एक वर्ष प्रशिक्षण झालं होतं. एका वर्षापूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफल्समध्ये त्याला पोस्टिंग मिळालं होतं.

रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील सह साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे, तर बहीण शिक्षण घेत आहे. काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना रोहित शहीद झाल्याचं वृत्त शिगाव गावात धडकल्यानंतर गावावर क्षणार्धात शोककळा पसरली. सर्व व्यवहार बंद करण्यात आले. शहीद रोमित चव्हाणचं पार्थिव रविवारी सायंकाळपर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.

एका दहशतवाद्याला कंठस्नान

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर लष्कराकडून प्रत्युतर देण्यात आलं. यात एका दहशतवाद्याच्या खात्मा झाला. मात्र, राष्ट्रीय रायफल्स दलाचे रोमित चव्हाण आणि संतोष यादव हे जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ श्रीनगरमधील ९२ बेस रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला’, अशी माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. धुमश्चक्रीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp